आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेतून वेस्ट इंडिजचा संघ बाहेर झाला आहे. भारताकडून सुपर-८चा सामना गमावल्यानंतर दोन वेळेचा टी२० विश्वविजेता बाहेर झाला, मात्र त्यांच्या प्रवासाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. टी२० विश्वचषकातून बाहेर होऊन वेस्ट इंडिजला चार दिवस झाले आहेत. तरीही ते कधी घरी रवाणा होणार, याची अधिकृत माहिती संघाला न मिळाल्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सोशल मीडियावर विचारणा केली आहे.
सॅमीने त्याच्या एक्सच्या अकाउंटवर पोस्ट केली असून त्यामध्ये म्हटले, “मला आता केवळ घरी जायचे आहे. आम्हाला काहीतरी अपडेट द्या. आज, उद्या, पुढील आठवड्यात. आता पाच दिवस झाले आहेत.”
काही रिपोर्ट्सनुसार, मिडल-ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे विमान वाहतुकीवर त्याचा अधिक परिणाम झाला आहे. यामुळे वेस्ट इंडिज चार दिवसापासून कोलकातामध्ये आहे. आयसीसीने वेस्ट इंडिजला सांगितले होते की त्यांच्या संघासाठी चार्टर फ्लाईटची व्यवस्था करण्यास येईल आणि तेथून त्यांना लंडनमध्ये आणत कॅरेबियन बेटावर पोहोचवले जाईल. त्यासाठी मात्र तारिख निश्चित झाली नाही.
झिम्बाब्वेचा संघही आधी भारतात अडकला होता. आयसीसीने हस्तक्षेप करत त्यांची घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. वेस्ट इंडिजप्रमाणे झिम्बाब्वेनेही त्यांचा शेवटचा सामना १ मार्चला खेळला होता. दिल्लीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते पराभूत झाले होते. तेव्हा झिम्बाब्वेला २ मार्चला भारतातून निघायचे होते. दुबईतील फ्लाईट्स रद्द झाल्याने त्यात नंतर बदल करण्यात आला. त्यांना अदीस अबाबा (इथियोपिया) मार्फत हरारेला पाठवले आहे. यामधील खेळाडू दोन गटाने रवाणा होणार असून एक गट निघाला आहे आणि दुसरा गट शुक्रवारी जाणार आहे.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसाठी हा क्षण मानसिक आणि लॉजिस्टिक स्तरावर आव्हानात्मक आहे. त्यामुळे खेळाडू आणखी थकले असून त्यांची चिंताही वाढली आहे. त्यांना कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने सॅमीने त्याची भावना व्यक्त केली आहे.






