जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये सहभागी होण्याची प्रत्येक क्रिकेटपटुची इच्छा असते. आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडला. या लिलावात राजस्थान रॉयल्सने खरेदी केलेला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याने आगामी आयपीएलमध्ये सहभागी होण्याविषयी मोठे विधान केले आहे.
राजस्थानने खरेदी केले मुस्तफिजुरला
बांगलादेशच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज असलेला मुस्तफिझुर रहमान २०२१ आयपीएल लिलावामध्ये सामील झाला होता. राजस्थान रॉयल्स संघाने त्याला एक कोटी रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मुस्तफिझुर यापूर्वी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे. २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या हैदराबाद संघाचा तो सदस्य होता. त्याच वर्षी त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळालेला.
…तर मी देशाला प्राधान्य देईल
मुस्तफिझुरची नुकतीच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या बांगलादेश संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी तो पत्रकारांना सामोरा गेला. त्याने आगामी आयपीएलमधील सहभागाविषयी बोलताना म्हटले, “बांगलादेश क्रिकेट बोर्ड म्हणेल तसे मी करेल. माझी श्रीलंका दौऱ्यावरील कसोटी सामन्यांसाठी संघात निवड झाली तर मी देशाला प्राधान्य देईल. समजा, मला निवडले गेले नाही आणि बोर्डाने आयपीएल खेळण्यासाठी मला ना हरकत प्रमाणपत्र दिले तर मी आयपीएलमध्ये सहभागी होईल. माझ्यासाठी देश सर्वप्रथम आहे.”
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिली आहे परवानगी
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या तारखा आयपीएलच्या दरम्यान येत आहेत. आगामी आयपीएलमध्ये मुस्तफिझुर रहमान व दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन हे दोनच बांग्लादेशी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. मुस्तफिझुर राजस्थान रॉयल्सचे तर शाकिब कोलकता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करेल.
महत्वाच्या बातम्या:
माजी भारतीय दिग्गज बेदी यांची प्रकृती चिंताजनक, करण्यात आली बायपास सर्जरी
युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! मास्टर ब्लास्टर देणार फलंदाजीचं मोफत प्रशिक्षण, पाहा कसं ते