मुंबई। 4 जूनला इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 फुटबॉल स्पर्धेत पार पडलेल्या भारत विरुद्ध केनिया सामन्यात भारताने 3-0 अशा फरकाने विजय मिळवला.
या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने 2 आणि जेजे लालपेखलुआ 1 गोल कले. हा सामना कर्णधार छेत्रीचा 100 वा सामना होता. यानिमित्त त्याने त्याच्या आठवणींना उजाळा दिला.
छेत्रीने त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाविषयीही एक मजेशीर आठवण सांगितली आहे. तो म्हणाला, ” मला अजूनही भारतासाठी खेळलेला पहिला सामना आठवतो. आम्ही पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच देशात खेळत होतो. मी आणि सइद रहिम नबी संघात नवोदित होतो. ”
“आम्ही थोडे आरामात होतो कारण आम्हाला वाटले होते की आम्हाला कदाचीत खेळण्याची संधी मिळणार नाही. पण सुखी सरांना (सुखविंदर सिंग) सवय होती की सामन्याच्या दिवशी नाश्ताच्या वेळेला सामना सुरु करणाऱ्या 11 खेळाडूंची नावे जाहिर करण्याची. त्यानुसार त्यांनी आमचीही नावे जाहीर केली. यामुळे मी उत्साहात असल्याने दुपारी वामकुक्षीही घेऊ शकलो नव्हतो.”
“आम्ही फक्त 20 वर्षांचे होतो आणि वरीष्ठ संघात खेळण्याची संधी मिळाल्याने आनंदी होतो. हे सगळ खूप विशेष होते. मी नशीबवान होतो की त्या सामन्यात मला गोल करता आला आणि मी इतका आनंदी होतो की मी पाकिस्तानमध्ये खेळत आहे हे विसरून गेलो. त्यामुळे मी पाकिस्तानी चाहत्यांच्या दिशेने पळत जाऊन आनंद साजरा करायला सुरवात केली.”
“तेव्हाचा खूप वाईट फोटोग्राफ आहे, ज्यात मी चाहत्यांसमोर सेलिब्रेशन करत आहे आणि तिथे संघातील कोणीही नव्हते. ”
छेत्रीने 12 जून 2005 ला पाकिस्तान विरुद्ध क्वेटा इथे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 सामन्यात 61 गोल केले आहेत.