मुंबई | भारतीय वनडे संघात मधल्या फळीत खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने मागील एक वर्षांपासून कामगिरीत सातत्य ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय वनडे संघातल्या चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी बरीच चर्चा झाली. नव्या दमाच्या या खेळाडूने दमदार कामगिरी केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
अंबाती रायडू, विजय शंकर, ऋषभ पंथ यांना चौथ्या क्रमांकासाठी आजमावण्यात आले. पण त्या जागेवर कोणताही खेळाडूं “फिट’ बसला नाही. विश्वचषकात सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव मिळाल्यानंतर भारतीय संघाने मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी दिली. श्रेयसने या संधीचे सोने करत वेस्ट इंडिज दौऱ्यावर दमदार कामगिरीने साऱ्यांना प्रभावित केले.
श्रेयस अय्यरने वेस्ट इंडीजनंतर न्यूझीलंड दौऱयातही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. न्यूझीलंडमधील वेगवान खेळपट्टय़ांवर त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकून सर्वाधिक धावा 217 धावा केल्या. तीन सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत चौथ्या क्रमांकावर खेळताना सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. मात्र, या मालिकेत भारताचा 0-3 अशा फरकाने पराभूत झाला.
इंडियन प्रीमियर लीग फ्रेंचायजी दिल्ली कॅपिटलच्या इन्स्टाग्राम चॅटमध्ये बोलताना अय्यर म्हणाला की, “जर आपण भारताकडून एक वर्ष एका स्थानावर खेळत असाल तर आपली जागा पक्की झालेली असेल, याबाबतीत पुन्हा प्रश्न आणि चर्चा व्हायला नको.
चौथ्या क्रमांकासाठी प्रचंड चर्चा होत असेल तेव्हा त्याच क्रमांकावर तुम्ही दमदार कामगिरी करत संघात स्थान पक्के केलं असेल तर ही गोष्ट खूपच सुखावह आहे.”
“संघाच्या गरजेनुसार मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे. विराट कोहली संघातील सर्वच खेळाडूंची कौतुक करतो. त्यावेळेस खूप छान वाटते. तो सर्वच युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे, असेही त्याने नमूद केले.”
कोहलीचे कौतुक करताना श्रेयस अय्यर म्हणाला की, “जेव्हा पण तो मैदानावर उतरतो तेव्हा तो आपला पहिला सामना खेळत खेळत आहे असे त्याला वाटते. तो कधीच थकत नाही. वाघासारखी ऊर्जा त्याच्यात आहे. मैदानात उतरतो तेव्हा त्याच्यावर वेगवेगळे हावभाव असतात. त्यापासून आपण खूप काही शिकू शकतो.”