भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (Ms Dhoni ) अनेक क्रिकेटपटू आदर्श मानतात. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले असून, तो सध्या आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येत असतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणं ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. परंतु अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होते. तर अनेकांचे स्वप्नं स्वप्नच राहून जाते. दरम्यान गतवर्षी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या युवा गोलंदाजाने आता एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२२ स्पर्धेचा लिलाव सोहळा पार पडणार आहे. या लिलाव सोहळ्यात अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केलेला युवा गोलंदाज चेतन सकारिया (Chetan sakariya).चेतन सकारियाचा स्टेशनरीच्या दुकानात काम करण्यापासून ते आयपीएल आणि भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रवास प्रेरणा देणारा आहे. आता आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनपूर्वी त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
न्युज ९ सोबत चर्चा करताना चेतन सकारियाने म्हटले की, “एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणं हे माझं स्वप्न आहे. त्यांनी इतक्या गोलंदाजांना घडविण्यात योगदान दिले आहे. ते माझा खेळ आणखी उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे मला जर संधी मिळाली तर नक्कीच मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायचं आहे.”
तसेच चेतन सकारियाला श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. यावेळी त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. गतवर्षी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत टाकले होते.
महत्वाच्या बातम्या :
विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यावर काय होती प्रतिक्रिया? शार्दुल ठाकूरचा खुलासा
मोईन अलीच्या पोराने ४१ वर्षीय आफ्रिदीला धू धू धुतला! एकाच षटकात ठोकले ३ षटकार, पाहा व्हिडिओ
संघाबाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या पुजारा अन् रहाणेला मिळाला आशेचा किरण, हिट झाले तर नशीब बदलणार