भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन १० महिन्याच्या आसपास कालावधी लोटला आहे. तरीदेखील, त्याच्या प्रसिद्धीमध्ये तसूभरही कमी आली नाही. आजही अनेक जण त्याच्या नेतृत्वाची व फलंदाजी कौशल्याची मुक्तकंठाने प्रशंसा करताना दिसून येतात. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू यासिर अराफत याने धोनीविषयी नुकतेच एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
धोनीसारख्या कर्णधाराची पाकिस्तानला गरज
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू यासिर अराफत याने नुकताच एका भारतीय युट्युब चॅनेलसोबत संवाद साधला. यामध्ये त्याने भारतीय क्रिकेट व पाकिस्तान क्रिकेट यांच्याविषयी मते व्यक्त केली. त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे कौतुक केले.
अराफत म्हणाला, “एमएस धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. तो निवृत्त झाला नसता तर, मी त्याला पाकिस्तान संघात निवडून त्याच्याकडे नेतृत्व सोपवले असते. पाकिस्तानला त्याच्यासारख्या कर्णधाराची गरज आहे. धोनी युवा खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेतो.”
धोनीच सर्वोत्तम फिनिशर
यासिर अराफत याने याच मुलाखतीत धोनीच्या फिनिशिंग कौशल्याची देखील तारीफ केली. अराफत म्हणाला, “शोएब अख्तर नेहमी म्हणत असत की, धोनीला गोलंदाजी करताना खूप विचार करावा लागत असे. तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. धोनी आणि मायकेल बेवन यांच्याव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज ५० पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा बनवू शकला नाही. तो मला सर्वोत्तम फिनिशर वाटतो.”
यासिर अराफत याने या मुलाखतीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियमितपणे सामने व्हावेत अशी इच्छा देखील व्यक्त केली.
धोनीने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू असलेल्या एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्याच नेतृत्वात भारताने टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी, धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनीजवळ इतक्या बाईक्स आहेत, त्याला स्वत:लाही आकडा सांगता येत नाही, भारतीय क्रिकेटरचा खुलासा
टीम इंडिया सावधान, न्यूझीलंडची ‘ही’ गोष्ट ठरु शकते घातक, माजी भारतीय दिग्गजाचा इशारा
अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला