---Advertisement---

आयसीसीकडून विनू मंकड यांना मोठा सन्मान; ५ युगांतील १० दिग्गजांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी(१० जून) मोठी घोषणा केली होती की यंदा ५ वेगवेगळ्या युगातील क्रिकेटमधील १० दिग्गजांचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला जाईल. त्यानुसार त्या १० दिग्गजांची नावे रविवारी (१३ जून) घोषित करण्यात आली आहेत. त्यामध्ये भारताच्या विनू मंकड यांना स्थान मिळाले आहे. 

तसेच यंदा १० दिग्गजांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला असल्याने आता आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये असणाऱ्या एकूण क्रिकेटपटूंची संख्या १०३ झाली आहे.

आयसीसीने कसोटीतील १० दिग्गजांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्याचा निर्णय पहिल्या-वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होण्यापूर्वी घेतला आहे. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साउथॅम्पटन येथे १८ ते २२ जून दरम्यान होणार आहे. त्यामुळे विशेष हॉल ऑफ फेमची घोषणा आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना असा योग जुळून आला आहे.

आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोलाचे योगदान दिलेल्या १० दिग्गजाचां आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला जात आहे. त्यामुळे आता हॉल ऑफ फेममध्ये असणाऱ्या क्रिकेटपटूंची संख्या १०३ होईल.’

आयसीसीने रविवारी घोषित केल्याप्रमाणे ५ युगातील कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रत्येकी २ दिग्गजांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करुन सन्मान करण्यात आला आहे. या १० दिग्गजांमध्ये ऑब्री फॉकनर, मॉन्टी नोबेल, सर लॅरी कॉन्संटंटाईन, सॅन मॅककॅबे, टेड डेक्सटर, विनू मंकड, डेसमंड हाईन्स, बॉब विलिस, अँडी फ्लॉवर आणि कुमार संगकारा या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

५ विविध युगातील १० दिग्गजांची विभागणी 

१. क्रिकेटमधील सुरुवातीचे युग (१९१८ पूर्वीचे) – ऑब्री फॉकनर (दक्षिण आफ्रिका) आणि मॉन्टी नोबेल (ऑस्ट्रेलिया)
२. दोन महायुद्धांदरम्यानचे यु (१९१८-१९४५) – सर लॅरी कॉन्संटंटाईन (वेस्ट इंडीज) आणि सॅन मॅककॅबे (ऑस्ट्रेलिया)
३. महायुद्धानंतरचे युग (१९४६-१९७०) – टेड डेक्सटर (इंग्लंड) आणि विनू मंकड (भारत)
४. वनडे युग (१९७१-१९९५) – डेसमंड हाईन्स (वेस्ट इंडिज) आणि बॉब विलिस (इंग्लंड)
५. अधुनिक युग (१९९६-२०१६) – अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे) आणि कुमार संगकारा (श्रीलंका)

आयसीसीच्या प्रसिद्ध पत्रकात मंकड यांचे कौतुक करण्यात आले आहे. आयसीसीने म्हटले आहे की ‘भारताच्या विनू मंकड यांनी ४४ कसोटी सामने खेळले, त्यात त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २१०९ धावा केल्या. तसेच ३२.३२ च्या सरासरीने १६२ विकेट्स घेतल्या आहेत. ते सलामीवीर होते आणि डावखरी फिरतीपटू होते. त्यांना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणले जाते.’

‘त्यांची सर्वात लक्षवेधी कामगिरी लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध १९५२ साली केलेली ठरली. त्यांनी त्यावेळी दोन डावात ७२ आणि १९४ धावा केल्या होत्या. तसेच ९७ षटके गोलंदाजी केली होती. तसेच ते त्या तीन क्रिकेटपटूंपैकी एक आहेत, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यांनी भारताच्या महान सुनील गावसकर यांनी प्रशिक्षणही दिले.’

महत्त्वाच्या बातम्या – 

कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोहली निभावणार कामचलाऊ गोलंदाजाची भूमिका? ‘या’ व्हिडिओतून मिळाले संकेत

मायदेशात इंग्लंडवर पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडने ८ विकेट्सने दुसरी कसोटी जिंकत मिळवला मालिका विजय

कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा डंका! इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाने गाठले ‘हे’ स्थान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---