आगामी जून महिन्यात इंग्लंडच्या साउथम्पटनच्या मैदानावर जागतिक क्रिकेट मधील महामुकाबला रंगणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येतील. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी जगभरातील क्रिकेट रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मात्र अद्यापही जगावर आलेले कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून बायो बबलमध्येच हा सामना खेळवला जाणार आहे. या संबंधीचे नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने नुकतेच जाहीर केले.
‘असे’ असतील नियम
आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार आणि इंग्लंड सरकारच्या नियमांनुसार भारतीय संघ ३ जून रोजी एका चार्टर्ड विमानाने इंग्लंडला पोहोचेल. यावेळी संघातील सर्व सदस्यांकडे कोरोनाच्या आर्ट-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल असणे, बंधनकारक असेल. तसेच यापूर्वी भारतीय संघातील सगळया सदस्यांनी चौदा दिवसांचे सक्त विलगीकरण पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर देखील साउथम्पटनच्या मैदानाच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये भारतीय संघ मुक्काम करेल. या हॉटेलमध्ये त्यांना दहा दिवसांचे विलगीकरण पूर्ण करावे लागेल.
या संपूर्ण विलगीकरणाच्या कालावधी दरम्यान संघातील सगळया सदस्यांचे नियमित निरीक्षण आणि परीक्षण केले जाईल. तसेच प्रत्येक वेळी कोरोना चाचणी देखील केली जाईल. या चाचणीच्या प्रत्येक नकारात्मक अहवालासह खेळाडूंना हळूहळू सरावाला सुरुवात करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र बायो बबलमध्ये राहूनच खेळाडूंना सराव करता येईल. सुरुवातीला छोट्या समूहात खेळाडूंना सराव करता येईल. मात्र त्यानंतर मोठ्या समूहात सराव करण्याची परवानगी त्यांना दिली जाईल.
त्यामुळे आता अंतिम फेरीपूर्वी या संपूर्ण कडक नियमावलीचे भारतीय संघाला पालन करावे लागणार आहे. या परिस्थितीत खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती जपणे, हे भारतीय संघापुढील प्रमुख आव्हान ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्यावेळी’ धोनीने केली होती पीटरसनची बोलती बंद, उथप्पाने उलगडला किस्सा
सुशीलआधी ‘या’ सहा ऑलिंपियनने भोगलाय तुरुंगवास; सुवर्णपदक विजेत्यांचाही समावेश
दम लगाके हैशा! रिषभ पंतने ‘या’ व्यक्तीला दाखवला आपला दम; उचलून फिरवले गरगर