आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) टी20 विश्वचषक 2024 साठी सुमारे 93 कोटी 51 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. विजेत्याला 20.36 कोटी रुपये आणि उपविजेत्याला 10.64 कोटी रुपये दिले जातील. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 6.54 कोटी रुपये मिळतील.
विजेत्या संघावर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होणार असला, तरी उपांत्य फेरीतील आणि शेवटच्या स्थानावर असलेल्या संघालाही बक्षीस निधीतून काही रक्कम दिली जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं हे पाऊल महत्त्वाचं आहे, कारण युगांडा, पापुआ न्यू गिनीसह अनेक सहयोगी देशांमध्ये क्रिकेटचा अद्याप विकास झालेला नाही. अशा स्थितीत आयसीसीनं दिलेला निधी तेथील क्रिकेटला चालना देण्यासाठी मदत करेल.
आयसीसीनं एका निवेदनात सांगितलं की, या टी20 विश्वचषक स्पर्धेतील विजेत्याला 2.45 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल, जी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च आहे. याशिवाय 29 जून रोजी बार्बाडोस येथे होणाऱ्या फायनलनंतर विजेत्या संघाला ट्रॉफी देखील दिली जाईल. सुपर 8 च्या पुढे न जाणाऱ्या चार संघांना प्रत्येकी 3.17 कोटी रुपये दिले जातील. तर 9व्या ते 12व्या स्थानावरील संघांना 2.05 कोटी रुपये आणि 13व्या ते 20व्या स्थानावरील संघांना 1.87 कोटी रुपये दिले जातील. तसेच प्रत्येक संघाला सामना जिंकण्यासाठी 25 लाख 89 हजार रुपये मिळतील (उपांत्य फेरी आणि फायनल वगळता).
55 सामन्यांची ही स्पर्धा युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमधील नऊ ठिकाणी 28 दिवसांपर्यंत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत प्रथमच 20 संघ सहभागी होत आहेत. पहिल्या फेरीतील 40 सामन्यांनंतर अव्वल आठ संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतील. त्यापैकी चार संघ उपांत्य फेरीत खेळतील.
महत्त्वाच्या बातम्या –
साउथ अफ्रीकेचा श्रीलंकेवर 6 गडी राखून विजय!
जर सुपर ओव्हरही टाय झाला तर मॅचचा निकाल कसा लागेल? नियम जाणून घ्या
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 3 रोमांचक सुपर ओव्हर्स! न्यूझीलंडचा दोनदा झालाय पराभव