आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. आता ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई (संयुक्त अरब अमिराती) येथे आयोजित होईल. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात एक करार झाला. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळणार असून उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होईल.
बीसीसीआय आणि पीसीबी यांनी 2026 टी20 विश्वचषकातील साखळी सामन्यांसाठी पाकिस्तान भारतात जाणार नाही यावर सहमती दर्शवली आहे. पाकिस्तान हा सामना कोलंबोमध्ये खेळणार आहे. हायब्रीड मॉडेलवर चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केल्यामुळे पीसीबीला कोणतीही भरपाई मिळणार नाही. मात्र पाकिस्तानला 2027 नंतर आयसीसीच्या एखाद्या महिला स्पर्धेचं यजमानपद भूषवायला मिळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत सरकारनं भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी दिली नाही. अशा परिस्थितीत ‘हायब्रीड मॉडेल’ हा एकमेव पर्याय होता. बीसीसीआयनं आयसीसीला पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली होती. आयसीसीच्या बैठकीत पीसीबीनं ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत स्पर्धेचं आयोजन करण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांची भूमिका मवाळ झाली.
1996 च्या विश्वचषकानंतर पाकिस्तानात आयोजित होणारी ही पहिली आयसीसी स्पर्धा आहे. तेव्हा भारत आणि पाकिस्तान त्या स्पर्धेचे सह-यजमान होते. भारत आणि पाकिस्तान यांनी 2012 पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. परंतु गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकासह आयसीसी स्पर्धांमध्ये संघ एकमेकांसमोर आले आहेत. गेल्या वर्षी भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्ताननं आयोजित केलेला आशिया कप देखील ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत खेळवण्यात आला होता. त्यानंतर भारतानं आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते.
भारतानं 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. 2008 मध्ये आशिया कपसाठी भारतीय संघ शेवटचा पाकिस्तानला गेला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये झाली होती. यानंतर दोन्ही संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी टूर्नामेंटमध्येच आमनेसामने आले आहेत. पाकिस्ताननं 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालेली शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
हेही वाचा –
ट्रॅव्हिस हेड गाबामध्ये भारताविरुद्ध काहीच करू शकणार नाही, आकडेवारी खूपच खराब!
गाबाच्या ऐतिहासिक स्टेडियमवर टीम इंडिया शेवटचा सामना खेळणार, जाणून घ्या कारण
पाकिस्तानच्या अष्टपैलू खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, एका वर्षात दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती