आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ एलार्डिस यांनी स्पष्ट केले आहे की, जागतिक क्रिकेट स्पर्धामध्ये महिलांना आणि पुरुषांना मिळमाऱ्या पुरस्काराच्या रक्कमेतील अंतर कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. आयसीसी २०२४ ते २०३१ दरम्यानच्या ८ वर्षाच्या काळात होणाऱ्या सर्व महिला आणि पुरुष स्पर्धांमध्ये समान स्थान मिळवणाऱ्या संघांसाठी पुरस्काराची रक्कम देखील समान करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सध्या न्यूझीलंडमध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक खेळला जात आहे, जो अंतिम टप्प्यात आला आहे. महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला पुरस्काराच्या रुपात जी रक्कम दिली जाणार आहे, ती २०१९ पुरुष विश्वचषक जिंकणाऱ्या संघापेक्षा ७५ टक्क्यांनी कमी आहे. आयसीसीचे अध्यक्ष ज्योफ एलार्डिस (Geoff allardice) यांच्याशी यासंदर्भात जेव्हा चर्चा केली गेली, तेव्हा त्यांनी याविषयावर स्पष्टीकरण दिले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या काही वर्षात हा फरक कमी होईल. तसेच २०२३ च्या जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच १९ वर्षाखालील महिला टी-२० विश्वचषक (U19 Womens T20 World Cup) आयोजित केला जाणार आहे.
एलार्डिस क्रिकेइंफोशी बोलताना म्हणाले की, “आयसीसीचे बहुतांशी आर्थिक बाबी ८ वर्षाच्या चक्रात ठरलेल्या असतात. आम्ही या चक्रात महिला आणि पुरुष संघामधील पुरस्काराच्या रकमेचे अंतर कमी करण्याचा प्रयत्नावर काम सुरू केले आहे. आम्ही पुढच्या चक्राच्या आस-पास चर्चा सुरू करणार आहोत. स्पर्धेत समान स्थानावर राहणाऱ्या महिलांना पुरषांच्या बरोबरीने बक्षीस रक्कम देण्याचा प्रयत्न केला जाईल. आता यामध्ये समानता नाहीय, पण आम्ही पुरस्काराच्या रकमेत समानतेच्या दिशेने पुढे जाऊ.”
पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना मिळणारा मोबदला आणि पुरस्काराची रक्कम कमी असल्यामुळे आयसीसी सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषाकात पुरस्काराची रक्कम आधीपेक्षा दुप्पट केली आहे. आता पुरस्काराच्या रुपात १.३२ मिलियन डॉलर्स (जवळपास १० कोटी रुपये) दिले जाणार आहेत. असे असले तरी, २०१९ पुरुष विश्वचषकात दिल्या गेलेल्या पुरस्काराच्या रकमेपेक्षा ही रक्कम ६.५ मिलियन डॉलर्सने कमी आहे. हा विश्वचषक इंग्लंडने जिंकला होता. आयसीसीच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, महिला विश्वचषकातील संघांची संख्या २०२९ मध्ये ८ ऐवजी १० होईल.
महत्वाच्या बातम्या –
संजू सॅमसनने पुण्यात पाडला षटकारांचा पाऊस, अवघ्या २५ चेंडूत झळकावले अर्धशतक, पाहा Video
राजस्थानविरुद्धच्या पराभवासोबतच हैदराबादच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद; वाचा सविस्तर