fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आजच्याच दिवशी ९ वर्षांपुर्वी भारताने पाकिस्तानला पाणी पाजत मिळवला होता विश्वचषकातील सर्वात मोठा विजय

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटले की खेळाडूंंबरोबरच चाहत्यांमध्येही चुरस पहायला मिळते. ९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच ३० मार्च २०११ला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात २०११ च्या विश्वचषकातील उपांत्य सामना मोहाली येथे पार पडला होता.

हा विश्वचषक इतिहासातील भारत विरुद्ध पाकिस्तानचा ५ वा सामना होता. याआधी झालेल्या चारही सामन्यात भारत विजयी ठरला होता. त्यामुळे पाकिस्तान हा इतिहास मोडण्याच्या प्रयत्नात या सामन्यात खेळणार होता. तर भारत हा इतिहास कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार होता. तसेच दोन्ही संघांना अंतिम सामन्यात प्रवेश करुन दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या जवळ पोहचायचे होते.

या सामन्याआधी भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

भारताने पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने चांगली सुरुवात केली होती. परंतू ६ व्या षटकात सेहवाग ३८ धावा करुन बाद झाला.

त्यामुळे गौतम गंभीर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्याने सचिनला चांगली साथ दिली. सचिन आणि गंभीरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी झाली. पण गंभीरही २७ धावांवर बाद झाला.

त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीलाही वहाब रियाझने ९ धावांवर बाद केले. रियाझच्या पुढच्याच चेंडूवर युवराज सिंगही शुन्यावर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद १४१ धावा अशी बिकट झाली होती.

परंतू अजून सचिन फलंदाजी करत होता. सचिन आणि धोनीमध्ये ५ व्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी झाली. मात्र अखेर ३७ व्या षटकात पाकिस्तानला सचिनची विकेट मिळाली. सचिन सईद अजमलच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याचा झेल पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने घेतला.

सचिनने ११५ चेंडूत ११ चौकारांसह ८५ धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे त्याआधी सचिन विरुद्ध पाकिस्तानने २ वेळा अपिल केले होते. एकदा पायचीतसाठी आणि एकदा यष्टीचीत झाले असल्याचे अपिल केले होते. पण त्यांचे हे अपिल पंचांकडून फेटाळण्यात आले होते.

सचिन बाद झाल्यानंतर धोनीही २५ धावावंर, हरभजन सिंग १२ धावांवर आणि झहीर ९ धावांवर बाद झाला. एकीकडे या विकेट्स जात असताना सुरेश रैनाने ३९ चेंडूत नाबाद ३६ धावा करत भारताला २६० धावांवर पोहचवून दिल्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

पाकिस्तानकडून वहाब रियाजने १० षटकात ४६ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. सईद अजमलने २ आणि मोहम्मद हाफिजने १ विकेट घेतली होती.

त्यानंतर २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानकडून सलामीवीर कमरान अकमल आणि मोहम्मद हाफिजने चांगली सुरुवात केली होती. पण झहिर खानने अकमलला १९ धावांवर बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला.

त्याच्यानंतर १६ व्या षटकात मुनाफ पटेलने ४३ धावांवर खेळणाऱ्या हाफिजला बाद केले. त्यानंतरही असद शाकिफ(३०) आणि युनुस खान(१३) यांनी स्वस्तात विकेट गमावल्या. त्यांच्यापाठोपाठ पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावायला सुरुवात केली. शाहिद आफ्रिदीही १९ धावांवर बाद झाला.

पण असे असले तरी एक बाजू मिस्बाह उल हकने सांभाळली होती. त्याने ७६ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार मारले होते. पण अखेर झहिरने त्याला बाद करत पाकिस्तानचा डाव २३१ धावांवरच संपुष्टात आणला. या सामन्यात झहिर खान, मुनाफ पटेल, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी २ विकेट घेत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. या सामन्यात सचिनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

भारताने २९ धावांनी हा सामना जिंकत तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्याआधी भारताने १९८३ आणि २००३ ला अंतिम सामना खेळला होता. यानंतर २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध मुंबईमध्ये झाला. हा सामना भारताने जिंकून विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला.

विशेष म्हणजे २००७ ला झालेल्या भारत-पाकिस्तान संघातील टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही मिस्बाह बाद होणारा शेवटचा फलंदाज होता. तो बाद झाल्याने पाकिस्तानने तो अंतिम सामना केवळ ५ धावांनी गमावला होता आणि उपविजेतेपदावर समाधान मानले होते.

ट्रेंडिंग घडामोडी – 

पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?

रोहितसह हे ३ फलंदाज टी२० क्रिकेटमध्ये करु शकतात द्विशतक

क्रिकेटमधील अशा ५ बॅट्स, ज्यांच्यामुळे झाले होते मोठे वाद

You might also like