पाकिस्तान आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदाबाबत मोठमोठे दावे करत होता. परंतु आता एक नवीन अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेऊ शकतं आणि या स्पर्धेचं आयोजन दुसऱ्या देशात होऊ शकतं. वृत्तानुसार, ही स्पर्धा दुबई, दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंका येथे हलवण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.
आयसीसीनं स्वतःसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानात आयोजित करणं. दुसरा पर्याय आहे हायब्रीड मॉडेल, ज्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अधिकारी नकार देत आहेत. हायब्रीड मॉडेल अंतर्गत, फक्त भारताचे सामने दुसऱ्या देशात आयोजित केले जातील. तर उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होतील. तिसरा पर्याय म्हणजे संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमधून दुसऱ्या देशात हलवणे, ज्यासाठी दक्षिण आफ्रिका, यूएई आणि श्रीलंका यांची नावं पुढे आली आहेत.
रिपोर्टनुसार, आयसीसी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याची अपेक्षा सर्वाधिक आहे. तरीही या तिन्ही पर्यायांसाठी बजेट तयार करण्याचा विचार सुरू आहे. अशा परिस्थितीत भारताच्या सामन्यांव्यतिरिक्त इतर सर्व सामने पाकिस्तानात होतील. ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर अन्य कोणत्याही देशात आयोजित करणं सोपं नाही. या विषयावर नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कोणतीही स्पष्ट घोषणा होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, भारत सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. एकूणच, भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडू नये यासाठी आयसीसीही जोरदार प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता आयसीसी यावर काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हेही वाचा –
टीम इंडियाबाहेर असलेल्या इशान किशनचं नशीब जोरात, या संघाचं कर्णधारपद मिळालं
4 कसोटी 4 शतकं, डॉन ब्रॅडमनपेक्षा कमी नाही हा क्रिकेटपटू! कसोटीत करतो वनडे स्टाईल फलंदाजी
रोहित शर्माचा साधेपणा! भर रस्त्यात थांबून दिल्या चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; सुंदर VIDEO व्हायरल