आयसीसीने वनडे आणि टी-२० पाठोपाठ दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाची देखील घोषणा केली आहे. या संघात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि ऑफस्पिनर आर अश्विन यांना ठाण मिळाले आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीकडे जागतिक संघाचे कर्णधारपद देखील सोपविण्यात आले आहे. १ जानेवारी २०११ ते ७ ऑक्टोबर २०२० या काळातील कामगिरी या संघाची निवड करताना विचारात घेण्यात आली होती. या कालावधीत ५ वर्षे खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाच संघात स्थान दिले आहे.
या संघाचे सलामीवीर म्हणून इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर यांची निवड करण्यात आली आहे. मधल्या फळीत न्यूझीलंडचा विद्यमान कर्णधार केन विलिअम्सन, भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ यांना स्थान देण्यात आले आहे. यष्टीरक्षक म्हणून श्रीलंकेचा माजी महान फलंदाज कुमार संगकाराला या संघात स्थान मिळाले आहे.
सातव्या क्रमांकावर अष्टपैलूच्या जागेवर इंग्लंडचा बेन स्टोक्स आहे. या संघात तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. यात दक्षिण आफ्रिकेचा ‘स्टेन गन’ म्हणून ओळखला जाणारा डेल स्टेन, आणि इंग्लंडची वेगवान गोलंदाजांची प्रसिद्ध जोडी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा समावेश आहे. या संघात एकमेव फिरकीपटू म्हणून भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनला स्थान दिले आहे.
आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम वनडे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद एमएस धोनीकडे सोपविण्यात आले आहे. त्यांनतर आता कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडेच सोपवण्यात आल्याने आयसीसीच्या तिन्ही संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडूंकडेच आले आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ:
अॅलिस्टर कूक, डेविड वॉर्नर, केन विलिअम्सन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव स्मिथ, कुमार संगकारा(यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर अश्विन, डेल स्टेन, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड.
महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
– मोठी बातमी! दशकातील सर्वोत्तम आयसीसी टी२० संघाचा एमएस धोनी कर्णधार, या तीन भारतीयांनाही मिळाले स्थान
– NZ vs PAK : पहिल्या डावात न्यूझीलंडचा ४३१ धावांचा डोंगर, प्रत्युत्तरात पाकिस्तानची अडखळती सुरुवात