वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा दुसरा दिवस पहिल्या दिवसाइतकाच रोमांचक ठरला. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 5 विकेट्स घेत खळबळ उडवून दिली, तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दक्षिण आफ्रिकेच्या अर्ध्याहून अधिक खेळाडूंना एकट्याने बाद करून खळबळ माजवली. कमिन्सने 18.1 षटकात 28 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. यासह कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्स पूर्ण केल्या. कसोटीत 300 विकेट्स घेणारा तो एकूण आठवा गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा सहावा वेगवान गोलंदाज बनला आहे. त्याने त्याच्या 68 व्या कसोटी सामन्याच्या 126 व्या डावात ही कामगिरी केली.
पॅट कमिन्सने कर्णधार म्हणून कसोटीत 9व्यांदा फाईव्ह विकेट हाॅल घेण्याची कामगिरी केली. अशाप्रकारे, तो कसोटीत सर्वाधिक फाईव्ह विकेट हाॅल घेणारा संयुक्त दुसरा गोलंदाज बनला. त्यानेरिची बेनॉडची बरोबरी केली. कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक फाईव्ह विकेट हाॅल घेण्याचा विक्रम इम्रान खानच्या नावावर आहे. इम्रानने 12 वेळा फाईव्ह विकेट हाॅल घेण्याचा पराक्रम केला होता.
कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक फाईव्ह विकेट हाॅल घेणारे
12- इम्रान खान
9 – पॅट कमिन्स*
9 – रिची बेनॉड
8 – बिशन सिंग बेदी
7- कोर्टनी वॉल्श
7 – जेसन होल्डर
आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत 5 बळी घेण्याचा पराक्रम करणारा पॅट कमिन्स जगातील पहिला कर्णधार बनला आहे. आयसीसी फायनलच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. यावरून ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा हा विक्रम किती मोठा आहे याचा अंदाज लावता येतो. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कमिन्स हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा कर्णधार आहे. त्याच्या पुढे फक्त रिची बेनॉड आणि इम्रान खान आहेत. त्याने आणखी 3 बळी घेताच तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा कर्णधार बनेल.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे कर्णधार
इम्रान खान – 187
रिची बेनॉड – 138
पॅट कमिन्स – 136
गॅरी सोबर्स – 117
डॅनियल व्हेटोरी – 116
कपिल देव – 111






