आज (२० जुलै) आयसीसीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबरोबरच आयसीसीने ३ मुख्य स्पर्धांसाठीचे कालावधीही निश्चित केले आहेत. यात २ टी२० विश्वचषक आणि १ वनडे विश्वचषकाचा समावेश आहे.
२०२० टी२० विश्वचषकाचे आयोजन या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान होणार होते. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यामध्येच या विश्वचषकाचे यजमानपद सांभाळण्यात असमर्थता दर्शविली होती. आता अखेर आयसीसीनेही ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसीने घेतलेल्या निर्णयांनुसार आता टी२० विश्वचषक पुढील वर्षी होईल. २०२१ टी२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाईल. या विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होईल.
त्यानंतर २०२२ मध्ये टी२० विश्वचषक खेळवला जाईल. २०२२ चा टी२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित केला जाईल. या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला होईल. तसेच २०२३ चा वनडे विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल आणि वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना २६ नोव्हेंबर २०२३ ला होईल.
BREAKING: The 2020 @T20WorldCup has been postponed.
DETAILS ???? https://t.co/O8pZAjwf9R pic.twitter.com/ZGF5pKxS7n
— ICC (@ICC) July 20, 2020
याबरोबरच आयसीसीने असेही सांगितले की पुढीलवर्षी फेब्रुवारीला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकाबद्दही पुर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
यावर्षीचा टी२० विश्वचषक पुढे ढकलला गेल्याने आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





