आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये शनिवारी (१४ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या दोन सामन्यात धावांचा पाऊस पडला. त्यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडला पराभूत करत सुपर ८ मध्ये जागा पक्की केली, रात्री झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत करत अनेक विक्रम केले.
स्कॉटलंड विरुद्ध इंग्लंड सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळला गेला. स्पर्धेच्या या २३व्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडला ५ विकेट्सने पराभूत केले. नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कॉटलंडने १९.४ षटकातच सर्व विकेट्स गमावत १५२ धावा केल्या. यामध्ये कर्णधार रिची बेरिंग्टनच्या ४९ धावा सर्वाधिक ठरल्या, दुसरीकडे इंग्लंडच्या आदिल राशिदने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने टॉम बॅंटनच्या नाबाद ६३ धावाच्या जोरावर १८.२ षटकातच लक्ष्य गाठले. या विजयाबरोबरच ते ग्रुप सी च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले.
अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना खेळला गेला. यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने कर्णधार एडन मार्करमच्या नाबाद ८६ धावांच्या जोरावर ते लक्ष्य १७.१ षटकातच पूर्ण केले.
या दोन्ही सामन्यांनी अनेक विक्रम झाले. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डि कॉक टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात यशस्वी विकेटकीपर बनला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध ३३वा शिकार करताच भारताच्या एमएस धोनीला (३२)मागे टाकले. त्यासाठी डिकॉकने ३० सामने खेळले असून धोनीने ३२ सामने खेळले आहेत. त्यामध्ये डिकॉकने २६ कॅच घेतले आणि ७ स्टम्पिंग केल्या आहेत.
या स्पर्धेत न्यूझीलंडची कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वाईटच ठरली आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेच्या इतिहासात एकमेंकाविरोधात ५ सामने खेळले असून पाचही सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.
मार्को यान्सेनने उत्तम गोलंदाजी करत ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार जिंकला. तसेच एडन मार्करमने दक्षिण आफ्रिकेकडून टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक केले (१९ चेंडू). इंग्लंडनेही खूप मोठ्या काळानंतर एखाद्या युरोपिय संघाला विश्वचषकात पराभूत केले आहे.
या सामन्यांमधील दोन्ही विजयी संघांनी त्यांचे सुपर -८चे स्थान पक्के केले आहे. न्यूझीलंडला मात्र त्यांच्या काय चुका होत आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे.






