भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली आहे. शनिवारी (७ फेब्रुवारी) भारताने यूएसएला २९ धावांनी पराभूत केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये मोहम्मद सिराजला जागा मिळाली. त्याने सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा त्याला आलेला कॉल, संघनिवड आणि त्याचे नशीब कसे बदलले, याबाबत सांगितले आहे.
यूएसएविरुद्धच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळला नाही. तसेच हर्षित राणा दुखापतीमुळे तर संघाबाहेर झालाच आहे. यामुळे सिराजची तत्परतेने भारताच्या टी२० विश्वचषकासाठीच्या संघात वर्णी लागली. त्याबाबत बोलताना सिराज म्हणाला, “सामन्याच्या दोन दिवसाआधी मला सूर्या भाईंचा फोन आला, त्यांनी मला सांगितले की ‘मियां, तुझे सामान पॅक कर आणि संघात सामील हो’. मी सूर्या भाईंना म्हटले की माझ्यासोबत मस्करी करु नको. मला खरचं वाटत नव्हते.”
“त्यानंतर ओझा भाईचाही (सिलेक्टर प्रज्ञान ओझा) कॉल आला. नाहीतर मी १५ फेब्रुवारीला रियल माद्रीदचा एक सामना आहे, जो पाहायला जाणार होतो आणि नंतर रमजान आहे. घरच्या मैदानावर टी२० विश्वचषक खेळण्याचे माझे स्वप्न होते आणि मी येथे असणे कदाचित हे ठरलेच होते,” असेही सिराजने पुढे म्हटले.
यूएसएविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली. त्याने संघाची स्थिती ७७ धावा ६ विकेट्स अशी असताना ४९ चेंडूत नाबाद ८४ धावा केल्याने भारताची स्थिती २० षटकाअंती ९ बाद १६१ धावसंख्या अशी झाली.
यूएसए लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरली असता सिराजने त्यांना सुरूवातीलाच दोन धक्के दिले. त्याने त्याच्या पहिल्या दोन षटकात दोन विकेट्स घेतले. भारताच्या बाकी गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली. त्यामुळे भारताने यूएसएला २० षटकात १३२ धावसंख्येवरच रोखले. यामध्ये सिराजने भारताकडून गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटकात २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
या स्पर्धेत भारताचा दुसरा सामना १२ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध आहे.






