भारताचा स्टार फलंदाज तिलक वर्मा अखेर मैदानावर परतला आहे. त्याने दुखापतीतून पुर्णपणे सावरत सरावही सुरू केला आहे. त्याची इंडिया ए संघात निवड झाली असून युएसए विरुद्ध टी२० विश्वचषकाचा वॉर्म-अप सामनाही खेळला. हा सामना सोमवारी (२ फेब्रुवारी) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला. त्यामध्ये तिलकने अष्टपैलू खेळी केली आहे.
तिलकने फलंदाजी करताना ३८ धावा केल्या. त्याने २४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारही मारले. यावरून तो पूर्णपणे फिट असल्याचा दिसत होता. त्याला दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या टी२० मालिकेला मुकावे लागले होते. त्याची भारताच्या टी२० विश्वचषक संघात निवड झाली असून त्यासाठी त्याचा अधिक सराव व्हावा याकडे लक्ष दिले जात आहे. त्यामुळे त्याला इंडिया ए मध्ये निवडले आहे.
युएसए विरुद्धच्या सामन्यात तिलकने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. एकेरी धावा घेत तो आधी खेळपट्टीवर सेट झाला. त्यानंतर त्याने काही उत्तम शॉट खेळले. त्याचबरोबर त्याने गोलंदाजीही जोर आजमावला. त्याने एक षटक टाकताना १५ धावा देत एक विकेटही घेतली.
या सामन्यात युएसएने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून नारायन जगदिसनने शतकी खेळी केली. त्याने ५५ चेंडूत १०४ धावा केल्या. त्यात ११ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. तसेच कर्णधार आयुष बदोनीने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने २६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार मारत ६० धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकात ३ विकेट्स गमावत २३८ धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत सर्वाधिक विकेट्स रवी बिश्नोईने घेतल्या. त्याने ४ षटकात ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हा सामना इंडिया ए ने ३८ धावांनी जिंकला. युएसएकडून सर्वाधिक धावा सलामीवीर अँड्रिज गॉसने केल्या. त्याने ३१ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याला तिलकने बाद केले.






