आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात आज (७ फेब्रुवारी) खेळला गेला. कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना पाकिस्तानने ३ विकेट्सने जिंकत स्पर्धेची विजयी सुरूवात केली आहे.
या सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या ३ षटकात विजयासाठी ३३ धावांची आवश्यकता होती. नेदरलॅंड्सच्या पॉल वॅन मीकेरनने १८व्या षटकात केवळ ४ धावा दिल्या. यामुळे मोठा उलटफेर होईल असे दिसत होते, कारण पाकिस्तानला शेवटच्या १२ चेंडूत २९ धावा पाहिजे होत्या आणि त्यांनी ७ विकेट्सही गमावल्या होत्या.
आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या फाहिम अशरफने झटपट खेळी केली. त्याने लोगान व्हॅन बीकच्या १९व्या षटकात २४ धावा वसूल केल्या. त्यामध्ये त्याने ३ षटकार, एक चौकार मारत आणि एक दुहेरी धाव घेत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. शेवटच्या षटकात ५ धावा पाहिजे होत्या, तेव्हा त्याने पुन्हा एकदा चौकार मारला आणि ३ चेंडू, ३ विकेट्स शिल्लक राखत सामना जिंकला. तसेच सामनावीरही तोच ठरला.
नेदरलॅंड्सच्या फलंदाजीची सुरूवात चांगली झाली. त्यांचा सलामीवीर मायकल लेविट लयीत दिसत असताना त्याने मारलेला एक शॉट सीमारेषेवर शाहीन आफ्रिदीने उत्तमरित्या झेलला. मायकल १५ चेंडूत २४ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने ३ चौकार आणि एक षटकार मारला.
त्यानंतर नेदरलॅंड्सची मोठी भागीदारी काही झाली नाही. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा कर्णधार-विकेटकीपर स्कॉट एडवर्ड्सने केल्या. त्याने २९ चेंडूत ३७ धावा केल्या. त्यामुळे नेदरलॅंड्सने १९.५ षटकात १० विकेट्स गमावत १४७ धावसंख्या केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने वेगाने सुरूवात झाली, मात्र पहिल्या दोन विकेट्स लवकरच गमावल्या. त्यानंतर साहिबजादा फरहान आणि बाबर आझमने तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. ही त्यांची या सामन्यातील सर्वोत्तम भागीदारी ठरली.
पाकिस्तानचा पुढील सामना १० फेब्रुवारीला युएसएविरुद्ध आहे. युएसएने पाकिस्तानला मागच्या विश्वचषकात पराभूत केले होते. तसेच या स्पर्धेत नेदरलॅंड्स दुसरा सामना १० फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध आहे.






