---Advertisement---

आयसीसीने निवडला अंडर-१९ वर्ल्डकपचा सर्वोत्तम संघ; यश धूलकडे नेतृत्त्व, तर ‘या’ दोन भारतीयांचाही समावेश

On: सोमवार, फेब्रुवारी 7, 2022 4:08 PM
Yash-Dhull
---Advertisement---

कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजमध्ये नुकताच १९ वर्षांखालील विश्वचषक  (U19 World Cup) पार पडला. या विश्वचषकाचे विजेतेपद यश धूल  (Yash Dhull) कर्णधार असलेल्या भारतीय संघाने पटकावले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा ४ विकेट्सने पराभव करत विक्रमी पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक आपल्या नावे केला. हा अंतिम सामना झाल्यानंतर आयसीसीने १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेचा सर्वोत्तम संघ निवडला आहे. 

आयसीसीने निवडलेल्या संघात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. यामध्ये कर्णधार यश धूल, अष्टपैलू राज बावा (Raj Bawa) आणि फिरकीपटू विकी ओत्सवाल (Vicky Ostwal) यांना आयसीसीने निवडलेल्या १२ जणांच्या संघात स्थान मिळाले आहे.

भारतासह एकूण आठ देशांच्या खेळाडूंना या संघात संधी दिली गेली आहे. यात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांच्या संघातील खेळाडूंचा समावेश आहे.

आयसीसीने सलामी जोडी म्हणून पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज हसीबुल्लाह खान आणि ऑस्ट्रेलियाच्या टीग वायली यांना निवडले आहे. तसेच या विश्वचषकात सर्वाधिक ५०६ धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसला तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज म्हणून निवडले असून यश धूल चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष गोष्ट अशी की या संघाचे कर्णधारपद यश धूलकडेच देण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्ट, श्रीलंकेच्या दुनिथ वेलालेज यांनाही या संघात संधी मिळाली आहे. राज बावा आणि विकी ओत्सवालव्यतिरिक्त या संघात बांगलादेशचा रिपन मोंदोल, पाकिस्तानचा अवेस अली, इंग्लंडचा जोश बायडेन आणि अफगाणिस्तानच्या नूर अहमद यांनाही संधी देण्यात आली आहे.

या संघात संधी मिळालेल्या यश धूलने या स्पर्धेत २२९ धावा केल्या होत्या. त्याच उपांत्य फेरीत झळकावलेल्या शतकाचाही समावेश आहे. तसेच भारताकडून राज बावाने शानदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याने युगांडाविरुद्ध १६२ धावांची खेळी करण्याबरोबरच स्पर्धेत २५२ धावा केल्या. तसेच त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. भारताकडून ओत्सवालने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने १२ विकेट्स या स्पर्धेत घेतल्या. 

असा आहे आयसीसीचा १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेचा सर्वोत्तम संघ
हसीबुल्लाह खान (यष्टीरक्षक), टीग वेली (ऑस्ट्रेलिया), डेवाल्ड ब्रेव्हिस (दक्षिण आफ्रिका), यश धूल (कर्णधार, भारत), टॉम प्रेस्ट (इंग्लंड), दुनिथ वेलालेज (श्रीलंका), राज बावा (भारत), विकी ओत्सवाल (भारत), रिपन मोंदोल (बांगलादेश), अवेस अली (पाकिस्तान), जोश बॉयडेन (इंग्लंड), नूर अहमद (अफगाणिस्तान).

महत्त्वाच्या बातम्या – 

अंडर १९ संघातील ‘हा’ खेळाडू भविष्यात घेऊ शकतो विराट कोहलीची जागा, दिग्गजाने केले भाष्य

शानदार सलामी देऊनही आता पूर्ण मालिकेत ईशान बसणार बाकावर! जाणून घ्या कारण

शेवटी क्रिकेटप्रेम! भारतीय संघ विश्वचषक जिंकावा म्हणून लता मंगेशकरांनी ठेवला होता निर्जळी उपवास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---