अँटिग्वा| वेस्ट इंडिजमध्ये २०२२ सालचा १९ वर्षांखालील विश्वचषक पार पडला. या विश्वचषकाचे विजेतेपद यश धूलच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने आपल्या नावावर केले. शनिवारी (५ फेब्रुवारी) अंतिम सामन्यात इंग्लंडला ४ विकेट्सने मात देत भारतीय संघाने विक्रमी पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले.
भारत सर्वात यशस्वी संघ
भारत हा १९ वर्षांखालील सर्वात यशस्वी संघ आहे. आजपर्यंत कोणत्याच संघाला पाच वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. भारताच्या खालोखाल ऑस्ट्रेलिया संघाने तीन वेळा १९ वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरले आहे.
आत्तापर्यंत १४ वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक खेळवण्यात आला असून सात संघांनी या स्पर्धेचे आत्तापर्यंत किमान एकदा तरी विजेतेपद जिंकले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पाकिस्तानने दोन वेळा हा विश्वचषक जिंकला आहे. तसेच इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी एकदा हा विश्वचषक जिंकला आहे.
भारतीय संघाने २०२२ पूर्वी २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वाखाली, २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली, २०१२ साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वाखाली आणि २०१८ साली पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.
असा झाला अंतिम सामना
शनिवारी झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणे पसंत केले होते. पण, त्यांची सुरुवात खराब राहिली. इंग्लंडने ९१ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. पण जेम्स ऱ्यू यांने एकाकी झुंज देताना ९५ धावांची खेळी केली. तसेच तळात जेम्स सेल्सने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडने ४४.५ षटकात सर्वबाद १८९ धावा केल्या.
त्यानंतर १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचीही सुरुवात संघर्षपूर्ण राहिली. मात्र, उपकर्णधार शेख राशिद आणि निशांत संधू यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ४८ व्या षटकात १९५ धावा करत विजय मिळवला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या संघांनी जिंकला आहे १९ वर्षांखालील विश्वचषक:
१९८८: ऑस्ट्रेलिया
१९९८: इंग्लंड
२०००: भारत
२००२: ऑस्ट्रेलिया
२००४: पाकिस्तान
२००६: पाकिस्तान
२००८: भारत
२०१०: ऑस्ट्रेलिया
२०१२: भारत
२०१४: दक्षिण आफ्रिका
२०१६: विंडीज
२०१८: भारत
२०२०: बांगलादेश
२०२२: भारत
महत्त्वाच्या बातम्या –
यश धूलच्या रुपात भारताला मिळाला पाचवा युवा विश्वविजेता कर्णधार, पाहा संपूर्ण यादी
भारतीय दिग्गजाने बनविली ऑल-टाईम U19 टीम; भारताच्या केवळ एका खेळाडूचा समावेश
मिताली राजने सांगितली आवडत्या चार क्रिकेटपटूंची नावे; एक भारताचा उगवता तारा






