भारत आणि वेस्ट इंडिज (INDvWI ODI Series) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला अहमदाबाद येथे रविवारी (६ फेब्रुवारी) सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघाने वेस्ट इंडिजला सहा गडी राखून पराभूत करत विजयी सलामी दिली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करून दाखवली. तसेच कर्णधार रोहित शर्मा व युवा सलामीवीर ईशान किशन यांनी भारताचा विजय सोपा केला. या सामन्यात आपल्या परिचित आक्रमक खेळापेक्षा काहीशी वेगळी खेळी करणाऱ्या ईशान किशन या मालिकेतील पुढच्या सामन्यात मात्र बाकावर बसावे लागणार आहे.
ईशानने दिली रोहितची साथ
या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १७६ धावा बनविल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्मा व ईशान किशन यांनी ८४ धावांची सलामी दिली. रोहितने आक्रमक ६० धावा बनविल्या. तर, ईशानने ३६ चेंडूंचा सामना करताना दोन चौकार व एक षटकार लगावत २८ धावांची खेळी केली. ईशान हा आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची ही खेळी पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.
पुढील सामन्यात बसावे लागू शकते बाकावर
पहिल्या सामन्यात भारतीय संघाला सोपा विजय मिळाला असला तरी, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात एक बदल होणे अपेक्षित आहे. संघाचा नियमित उपकर्णधार व सलामीवीर केएल राहुल दुसऱ्या सामन्यातून संघात पुनरागमन करेल. दक्षिण आफ्रिका दौ-यानंतर त्याने विश्रांती घेतली, अशी बातमी समोर आली होती. मात्र, आपल्या बहिणीच्या लग्नामुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. आता दुसऱ्या सामन्यासाठी तो संघात दाखल झाला असून, त्याला अंतिम संघात जागा मिळणे निश्चित आहेत.
राहुल संघात आला असल्याने आपोआप ईशान किशन याला संघातून बाहेर व्हावे लागेल. कारण, रोहित व राहुल ही भारताची पहिल्या पसंतीची सलामी जोडी आहे. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथेच खेळला जाईल.
दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या-
गडी बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजचे हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर होत आहे व्हायरल – व्हिडिओ
‘असा’ आहे अंडर १९ विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचा भविष्यातील ‘मास्टर प्लॅन’, स्वतः केला खुलासा
…नाहीतर दिल्ली कसोटीत १० विकेट्स कुंबळेसाठी ठरलं असतं स्वप्न