भारतीय दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याला आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये मोठा फायदा झाला आहे. बुधवारी (दि. 29 मार्च) आयसीसी क्रमवारी जाहीर झाली. यामध्ये विराटने गरुडझेप घेतली. विराट पुन्हा एकदा जुन्या अंदाजात परतताना दिसत आहे. मागील काही वर्षांपासून विराट खराब फॉर्मचा सामना करत होता. मात्र, आता त्याने दमदार पुनरागमन केले आहे. वनडे क्रमवारीतील त्याच्या गुणांमध्ये उसळी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. विराटने त्याचा शेवटचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळला होता. या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते. त्यामुळे तो आयसीसी वनडे क्रमवारीत सातव्या स्थानी पोहोचला आहे.
विराटने रोहितला पछाडले
विराट कोहली (Virat Kohli) हा मागील काही काळापूर्वी आयसीसी वनडे क्रमवारीतील (ICC ODI Rankings) अव्वल 10 खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडला होता. मात्र, आता विराट जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. सध्या त्याची वनडे क्रमवारीतील गुण हे 719 इतके असून तो सातव्या स्थानी आहे. विराटने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकले आहे. रोहित 707 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
विराटने 2023मध्ये ठोकली दोन शतके
विराट कोहली याच्यासाठी आतापर्यंत 2023 हे वर्ष चांगले गेले आहे. त्याने यावर्षी एकूण 9 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने फलंदाजी करताना 53.37च्या सरासरीने आणि 116.03च्या स्ट्राईक रेटने 427 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 1 अर्धशतकही आले आहे. विराटची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 166 इतकी राहिली आहे.
दुसरीकडे, विराटने आतापर्यंत 2023मध्ये 13 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 15 डावात 51.71च्या सरासरीने 724 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन शतके आणि 1 अर्धशतक केले आहे. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 186 इतकी आहे.
विराटची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहली याने आतापर्यंत एकूण 108 कसोटी, 274 वनडे आणि 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 28 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 8416 धावा केल्या आहेत. तसेच, वनडेत त्याने 46 शतके आणि 65 अर्धशतकांच्या मदतीने 12898 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी20त त्याने 37 अर्धशतके आणि 1 शतकाच्या मदतीने 4008 धावा केल्या आहेत. (icc odi ranking virat kohli moves to number seven read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC Rankings : राशिद खान बनला टी20चा बादशाह, आयपीएलपूर्वीच ‘या’ गोलंदाजाला पछाडत पटकावले अव्वलस्थान
IPL2023 । मोठी बातमी : मुळ पाकिस्तानी खेळाडू करणार आयपीएलमध्ये हिंदीतून कॉमेंट्री, नाव जाहीर चर्चेला सुरुवात