विश्वचषक 2023 स्पर्धेतील 26व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 1 विकेटने जिंकला. हा पाकिस्तानविरुद्ध खेळताना आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. अशाप्रकारे पाकिस्तानवर विश्वचषकात पहिल्यांदाच सलग 4 सामने गमावण्याची नामुष्की ओढवली. हा सामना पाकिस्तान जिंकू शकला असता, जर त्यांनी 15 वाईड टाकले नसते, तसेच पंचांनी हॅरिस रौफच्या षटकात तबरेज शम्सीला बाद पायचीत घोषित दिले असते. अशात या निराशानजक पराभवानंतर बाबर आझम याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला बाबर आझम?
पराभवानंतर बाबर आझम (Babar Azam) याने मोठे विधान केले. तो म्हणाला, “सामना नजीकचा होता, पराभव पत्करणे खूपच दुर्दैवी आहे. ज्याप्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी केली, ती प्रशंसनीय आहे. मात्र, आम्हाला 10-15 धावा कमी पडल्या. डीआरएसवर निर्णय आमच्या बाजून किंवा विरोधी संघाच्या बाजूने जाणे, हा खेळाचा भाग आहे. आम्ही सामन्यात चांगली झुंज दिली. मात्र, आमच्यासाठी दरवाजे बंद झाले नाहीयेत, पण आम्हाला वास्तवाची जाणीव आहे.”
पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर?
खरं तर, या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे उपांत्य सामन्यात पोहोचणे कठीण झाले आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांना फक्त 2 सामने जिंकण्यात यश आले आहे. मागील चारही सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. पाकिस्तान संघ 4 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच, इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.
सामन्याचा आढावा
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तान संघाने 46.4 षटकात आपल्या सर्व विकेट्स गमावत 270 धावा केल्या होत्या. यावेळी पाकिस्तानकडून बाबर आझम (50), सौद शकील (52) आणि शादाब खान (43) यांनी शानदार योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 47.2 षटकात 9 विकेट्स गमावत 271 धावा करत सामना 1 विकेटने जिंकला. (icc odi world cup 2023 babar azam statement after lose match against south africa pak vs sa read)
हेही वाचा-
चेपॉकवर रंगला वर्ल्डकपचा पहिला थ्रिलर! रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेची पाकिस्तानवर मात, महाराज ठरला हिरो
जोरदार कमबॅक करणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार न्यूझीलंड, विजयासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार दोन्ही संघ