आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीने (आयसीसी) दरमहा क्रिकेटच्या तीनही स्वरूपात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ चा पुरस्कार दिला जातो. अशातच ऑक्टोबर महिन्याच्या ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा देखील करण्यात आली आहे.
सध्या यूएई आणि ओमानमध्ये टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या आसिफ अलीची ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली आहे.यामध्ये आसिफ अलीसह बांगलादेश संघाचा शाकिब अल हसन आणि नामिबिया संघाचा डेविड विसे यांना देखील नामांकन मिळाले होते. परंतु, शेवटी आसिफ अलीने बाजी मारली आणि पुरस्कार पटकावला.
पाकिस्तान संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहचवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने न्यूझीलंड आणि अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यांत महत्त्वाच्या खेळ्या केल्या होत्या. यामुळे पाकिस्तान संघाला दोन्ही सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते.
जेव्हा संघाला जास्त गरज होती, त्यावेळी अलीने महत्वाची खेळी केली होती. या स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट २७० पेक्षा ही अधिकचा आहे. अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने एकाच षटकात ४ षटकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला होता. आता पाकिस्तान संघाचा उपांत्य फेरीतील सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात देखील आसिफ अलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
तसेच महिला क्रिकेटमध्ये आयर्लंड संघाची कर्णधार लौरा डेलानीची ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली आहे. तिने झिम्बाब्वे संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तिने या मालिकेत १८९ धावा करत ४ गडी देखील बाद केले होते.