आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या टी20 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताचा युवा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम राखत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेदरम्यान जाहीर झालेल्या या रँकिंगमध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले असून, सूर्यकुमार यादवची टॉप 10 मध्ये दमदार पुनरागमन ही देखील चर्चेची बाब ठरली आहे.
अभिषेक शर्माची रेटिंग यावेळी 929 पर्यंत पोहोचली आहे. मागील रँकिंगमध्ये त्याच्याकडे सुमारे 903 गुण होते, मात्र सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, 2025 मध्ये अभिषेकची रेटिंग 931 इतकी सर्वोच्च होती. यंदा तो त्या विक्रमापासून केवळ दोन गुण दूर आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म कायम राहिला, तर अभिषेक नवा इतिहास रचण्याची प्रबळ शक्यता आहे.
एकेकाळी आयसीसी टी20 रँकिंगमध्ये नंबर वन राहिलेला सूर्यकुमार यादव काही काळ टॉप 10 बाहेर गेला होता. मात्र आता त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. पाच स्थानांची झेप घेत सूर्या थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याची रेटिंग सध्या 717 आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सलग दोन सामन्यांत अर्धशतके झळकावत आणि नाबाद राहत त्याने ही झेप मिळवली.
अभिषेक शर्मानंतर दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा फिल सॉल्ट आहे. त्याची रेटिंग 849 असून, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकातील अंतर आता अधिक वाढले आहे. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकात अभिषेक नंबर एक फलंदाज म्हणूनच मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय संघाचा तिलक वर्मा सध्या खेळत नसला, तरी तो 781 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. इंग्लंडचा जोस बटलर (770) चौथ्या, तर पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (763) पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा पथुम निसंका सहाव्या क्रमांकावर आहे. या सर्वांच्या रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
सूर्यकुमार यादवच्या टॉप 10 मधील प्रवेशामुळे ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि टिम सायफर्ट यांना प्रत्येकी एक स्थान गमवावे लागले आहे. तरीही हे तिन्ही फलंदाज टॉप 10 मध्ये कायम आहेत.






