ICC Emerging Player of the Year: ICC ने बुधवारी (3 जानेवारी) रोजी वर्ष 2023 साठी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरसाठी नामांकित खेळाडूंची नावे जाहीर केली. गेल्या वर्षी अनेक तरुण खेळाडूंची कामगिरी जबरदस्त होती. आयसीसीने निवडलेल्या स्पर्धकांमध्ये भारताचा यशस्वी जयसवाल, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र, दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झी आणि श्रीलंकेचा दिलशान मधुशंका यांचा समावेश आहे.
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गेल्या वर्षी भारतीय संघात आपले स्थान निर्माण करणाऱ्या यशस्वी जयसवाल ( Yashasvi Jaiswal) याने अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या वर्षी त्याने भारतासाठी कसोटी आणि टी20 पदार्पण केले. या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याचे पदार्पण वेस्ट इंडिज दौऱ्यावर झाले होते. डावखुऱ्या खेळाडूने पदार्पणाच्या कसोटीतच शानदार शतक झळकावले होते. त्याचवेळी त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत टी20 फॉरमॅटमध्ये शतक झळकावले. गेल्या वर्षी त्याने कसोटीत 57.60 च्या सरासरीने 288 धावा आणि टी20 मध्ये 33.07 च्या सरासरीने 430 धावा केल्या होत्या.
गेले वर्ष न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याच्यासाठी जबरदस्त होते आणि त्याने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या कामगिरीने मोठ्या मंचावर आपली प्रतिभा सिद्ध केली. न्यूझीलंडकडून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडूही होता. डावखुऱ्या खेळाडूने गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यात 41 च्या सरासरीने 820 धावा केल्या आणि गोलंदाजीत 18 विकेट्स घेतल्या. टी20 फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडसाठी 91 धावा करण्यासोबतच त्याने 5 विकेट्सही घेतल्या.
श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका (Dilshan Madhushanka) हाही गेल्या वर्षी बातम्यांमध्ये चर्चेत होता. या गोलंदाजाने श्रीलंकेला विश्वचषकापर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने प्रथम पात्रता फेरीत आणि नंतर मुख्य स्पर्धेत आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. गेल्या वर्षी या डावखुऱ्या गोलंदाजाने एकदिवसीय सामन्यात 24.06 च्या सरासरीने 31 विकेट्स आणि टी20 मध्ये 33 च्या सरासरीने 6 विकेट्स घेतल्या होत्या.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा गेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) हा उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. त्याने विश्वचषकातही चमकदार गोलंदाजी केली आणि अलीकडील विश्वचषकात आपल्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. या गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेसाठी गेल्या वर्षी कसोटीत 21.70 च्या सरासरीने 10 विकेट्स, एकदिवसीय सामन्यात 23.22 च्या सरासरीने 31 विकेट्स आणि टी20 मध्ये 23.33 च्या सरासरीने 6 विकेट्स घेतल्या. (ICC announces players for Emerging Player of the Year India’s explosive opener included)
हेही वाचा
वाईट! शेवटची 14 मिनिटे आणि 12 चेंडूमध्ये टीम इंडियाच्या बत्त्या गुल, संघ ऑलआऊट
संपुर्ण वेळापत्रक: प्रत्यक्ष मैदानात जाऊन मॅचेस पाहण्याची संधी, 2024मध्ये ‘इंडिया’ खेळणार तुफान सामने