टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र १ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सरकारने भारताच्या विरोधात न खेळण्याची घोषणा केली. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी ‘आयसीसी’चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याशी चर्चा करण्यासाठी लाहोरला पोहोचले होते. या बैठकीत बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल हे देखील उपस्थित होते. भारतासोबत खेळण्यासाठी पाकिस्तानने आयसीसीसमोर ४ अटी ठेवल्या होत्या.
एबीपी न्यूजच्या सूत्रांनुसार, आयसीसीने पाकिस्तानच्या चारही अटी मान्य करण्यास नकार दिला आहे. ८ फेब्रुवारी रोजी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी, आयसीसी उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांच्यात लाहोरमध्ये अनेक तास बैठक चालली. या बैठकीत पीसीबीने आयसीसीसमोर ४ मोठ्या अटी मांडल्या होत्या.
पीसीबीने आयसीसीकडे भारताविरुद्धची द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानने ही द्विपक्षीय मालिका ‘न्यूट्रल व्हेन्यू’वर (तटस्थ ठिकाणी) खेळवण्याची अट ठेवली आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान २०१२ पासून एकही द्विपक्षीय मालिका खेळवली गेलेली नाही. दोन्ही संघ फक्त आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात.
दुसरी मागणी म्हणून पाकिस्तानने आयसीसीला सांगितले की, आयसीसीच्या महसुलातील त्यांचा वाटा वाढवून तो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या बरोबरीचा करण्यात यावा. याशिवाय, बीसीसीआयने भारताविरुद्धचा ‘नो हँड शेक’ (हस्तंदोलन न करणे) वाद संपवावा, अशीही मागणी केली. आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. याव्यतिरिक्त, पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा देत त्यांना पूर्ण भरपाई देण्याची अट घातली. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आयसीसीने या मागण्या आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत सर्व अटी फेटाळून लावल्या आहेत.






