भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघावर २-० ने विजय मिळवला होता. या मालिकेनंतर आयसीसीने महिला टी२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघातील फलंदाजांना मोठा तोटा झाला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका होण्यापूर्वी शेफाली वर्मा टी२० क्रमवारी सर्वोच्च स्थानी होती. तर या मालिकेनंतर ती दुसऱ्या स्थानी सरकली आहे. ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाज बेथ मुनीने टी२० क्रमवारीमध्ये पहिले स्थान गाठले आहे. तसेच स्म्रीती मंधना तिसऱ्या क्रमांकावर टिकून आहे.
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर पुढील दोन सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली होती.
शेफाली वर्माचे सध्या क्रमवारीत ७२६ रेटिंग पॉइंट्स आहेत. तर बेथ मुनीने ७५४ रेटिंग पॉइंट्ससह या यादीत सर्वोच्च स्थान गाठले आहे. तसेच स्म्रीती मंधानाचे ७०९ रेटिंग पॉइंट्स आहे.
फलंदाजी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा दबदबा आहे. बेथ मुनीसह कर्णधार मेग लेनिंग चौथ्या स्थानी आहे. तर एलिसा हिली सहाव्या स्थानी आहे. तसेच न्यूझीलंड संघाची फलंदाज सोफी डिवाइन पाचव्या आणि सुजी बेट्स सातव्या स्थानी आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत दोन डावात ५ गडी बाद करणाऱ्या राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजांच्या क्रमवारीत १२ वे स्थान गाठले आहे. तर एश्ले गार्डनरने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत १० वे स्थान मिळवले आहे. तसेच २३ धावा आणि ३ गडी बाद करणारी जॉर्जिया वेयरहॅम ४८ व्या स्थानी पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहली आता आयपीएलही सोडू शकतो, ‘या’ माजी क्रिकेटरने मत व्यक्त करताना कारणही केले स्पष्ट
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश, पण बीसीसीआयला सतावतेय ‘ही’ चिंता
कहर कारनामा! उत्तम प्रदेशच्या वासु वत्सचा मोठा पराक्रम, हॅट्रिकसह घेतल्या तब्बल ८ विकेट्स