आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत शनिवारी (३० ऑक्टोबर) दुबईच्या मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात १२६ धावांचा पाठलाग करत असलेल्या इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया संघावर ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड संघाने विजयाची हॅटट्रिक पूर्ण करत गट १ च्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे.
गट १ बद्दल बोलायचं झालं तर इंग्लंड संघाने आतापर्यंत एकूण ३ सामने खेळले आहेत. या तीनही सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे ६ गुणांसह इंग्लंड संघ अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंड संघाने मिळवलेल्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिका संघाला झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी प्रत्येकी २-२ सामन्यात विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांचे गुण ४ आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया संघ पराभूत झाल्यामुळे, दक्षिण आफ्रिका संघ नेट रनरेटच्या जोरावर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेला हा सामना क्वार्टर फायनल सामन्यासारखा झाला. कारण ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. गट १ मध्ये सर्व संघ बलाढ्य संघ आहेत. परंतु इंग्लंडनंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
अशी आहे गट २ च्या पॉइंट्स टेबलची स्थिती
गट २ मध्ये पाकिस्तान संघ सर्वोच्च स्थानी आहे. पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुरुवातीच्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे. हा संघ ६ गुणांसह प्रथमस्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी २ गुणांसह अफगानिस्तान आणि तिसऱ्या स्थानी २ गुणांसह नामिबिया संघ आहे. तर न्यूझीलंड संघ चौथ्या आणि भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे.
रविवारी (३१ ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि अफगानिस्तान विरुद्ध नामिबिया या दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल होऊ शकतात.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना १० नोव्हेंबर रोजी अबू धाबीच्या मैदानावर पार पडणार आहे. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना ११ नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये पार पडणार आहे. तसेच स्पर्धेतील अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बटलर-बेअरस्टो जोडीने षटकारांची वर्षा करत झम्पाची उडवली दाणादाण, बघून मॉर्गनलाही आली दया
मागच्या बाजूने धावत जात वोक्सचा भन्नाट एकहाती झेल; व्हिडिओ पाहून कौतुकाने वाजवाल टाळ्या






