आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात रविवारी (१७ ऑक्टोबर) होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून चाहते ही स्पर्धा सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यापूर्वी ही स्पर्धा भारतात पार पडणार होती. परंतु कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जाणून घेऊया या स्पर्धेची रूपरेखा.
या स्पर्धेचा प्रारंभ पात्रता फेरीतील सामन्यांनी होणार आहे. हे सामने जिंकून संघ सुपर १२ मध्ये प्रवेश करणार आहेत. तर उर्वरित ८ संघांनी आयसीसी रँकिंगच्या जोरावर सुपर १२ मध्ये स्थान मिळवले आहे. या स्पर्धेतील पहिली लढत १७ ऑक्टोबर रोजी ओमान आणि पापूआ न्यू गिनी यांच्यात पडणार आहे. तर संध्याकाळी बांगलादेश आणि स्कॉटलॅंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. पात्रता फेरीतील सामने २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ सामन्यांना प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेत किती संघ घेणार सहभाग?
या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ८ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तर इतर ८ संघ पात्रता फेरीतील सामने खेळणार आहेत. या संघांची देखील दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पात्रता फेरीतून ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरणार आहेत.
पात्रता फेरीत आणि सुपर १२ मध्ये किती संघ आहेत?
पात्रता फेरी ग्रुप ए –
श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड आणि नांबिया
पात्रता फेरी ग्रूप बी –
बांगलादेश, स्कॉटलॅंड, पापुआ न्यू गिनी आणि ओमान
सुपर १२ साठी असे आहेत संघ
सुपर १२ ग्रुप ए –
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, ए १ आणि बी २
सुपर १२ ग्रुप बी –
भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगानिस्तान, बी १ आणि ए २
कुठल्या स्वरूपात खेळले जाणार सामने?
सुपर १२ फेरीत एकूण ३० सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक ग्रूपमधील संघांना इतर संघासोबत एक सामना खेळायला मिळणार आहे. त्यानंतर जे संघ टॉप-२ मध्ये येणार त्यांना उपांत्य फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. सुपर १२, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतील सामने अबू धाबी, शारजाह आणि दुबईमध्ये पार पडणार आहेत.
कुठल्या पद्धतीने दिले जाणार गुण?
प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला २ गुण दिले जाणार आहेत. जर सामना बरोबरीत सुटला किंवा अनिर्णीत राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जाणार आहेत.
सामना बरोबरीत सुटल्यास कोणता संघ होणार विजयी?
टी-२० क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरने निकाल लावला जातो. या स्पर्धेतही असेच होणार आहे. परंतु जर सुपर ओव्हर खेळवण्यात अडथळा निर्माण झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. हीच परिस्थिती जर उपांत्य फेरीच्या सामन्यात उद्भवली तर, सुपर १२ मध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या संघाला विजेता संघ म्हणून घोषित केले जाईल.
या स्पर्धेत डीआरएस असणार का?
होय, ही पहिलीच वेळ आहे, ज्यामध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंना डीआरएसची सुविधा मिळणार आहे. प्रत्येक संघांना प्रत्येक डावात २-२ डीआरएस दिले जाणार आहेत.
विजेत्या संघांना किती मिळणार रक्कम?
आयसीसीतर्फे विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर्स म्हणजे १२ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलर्स म्हणजे ६ कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर उपांत्यफेरीच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघांना प्रत्येकी ४-४ लाख डॉलर्स म्हणजे ३-३ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माही जिथे, आम्ही तिथे!’, आयपीएल फायनलमध्ये चाहतीने झळकवलेल्या पोस्टरने वेधले लक्ष
शास्त्रींपेक्षा जास्त पगार ते भारतीय संघाहून अधिक जबाबदारी, द्रविडसाठी बीसीसीआयची मोठी योजना
सुट्टी नाय..! ‘भारताविरुद्ध पराभव झाल्यास घरी येऊ देणार नाही…’, पाकिस्तानच्या कर्णधाराला धमकी