आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ८ सप्टेंबरला (बुधवारी) झाली आहे. संघातील बरीचशी नावे ही अनपेक्षित होती. विश्वचषकाच्या संघात दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला संधी देण्यात आली आहे. तो चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळणार आहे. त्याने त्याचा शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०१७ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध खेळला होता. अश्विनला संघात मिळालेल्या संधीनंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
गावसकर स्पोर्ट्स तकशी बोलत होते. ते म्हणाले, “अश्विनचे पुनरागमन चांगली गोष्ट आहे, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही? हे पाहावे लागेल. इंग्लंडमध्येही तो यावेळी संघाचा भाग आहे. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जात नाहीये. शक्यतो इंग्लंड दौऱ्याची निराशा दूर करण्यासाठी त्याला टी२० विश्वचषकासाठीच्या संघात निवडले गेले आहे. तो अंतिम ११ चा भाग असेल का? सध्या हा मोठा प्रश्न आहे.”
रविचंद्रन अश्विनचे संघात दिर्घ काळानंतर पुनरागमन झाले आहे, पण भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवन आणि फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल यांना टी२० विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात संधी मिळालेली नाही. असे असले तरीही, भारताचा युवा फिरकी गोलंदाज राहुल चाहर याच्यावर संघाने विश्वास दाखवला आहे आणि त्याला संघात संधी मिळाली आहे. तसेच चाहत्यांना मोठ्या काळानंतर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांची जोडी मैदानात एकत्र गोलंदाजी करताना दिसण्याचीही शक्यता आहे.
विश्वचषकासाठी भारताचा संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मुहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या-
चार वर्षांनंतर अश्विनचे टी२०त पुनरागमन; कर्णधार, प्रशिक्षक किंवा निवडकर्ते नव्हे ‘या’ शिलेदाराचा हात
फॉर्मात असूनही टी२० विश्वचषकासाठी लागली नाही पृथ्वी शॉची वर्णी, ‘या’ खेळाडूमुळे भंगले स्वप्न
धोनीपुढे मोठा पेच, टी२० विश्वचषकात भारताचा मार्गदर्शक बनण्यासाठी सोडावी लागणार सीएसकेची साथ!