येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच काही खेळाडूंनी आपले नाव मागे घेतले आहे. मात्र ही स्पर्धा खेळाडूंसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण ही स्पर्धा संपल्यानंतर युएईमध्येच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा चांगलाच सराव होणार आहे.
आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगातील दिग्गज क्रिकेटपटू सहभाग घेत असतात. त्यामुळेच या स्पर्धेचा दर्जा उंचावला आहे. दरम्यान या स्पर्धेत असेही काही खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली. तसेच कर्णधार म्हणून टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. परंतु त्यांना इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कर्णधाराची भूमिका पार पाडायची संधी मिळाली नाही. (Icc T20 world cup winning captains who never got captaincy chance)
१) युनूस खान-
भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडलेला २००७ टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आजही सर्वांना आठवण असेल. या सामन्यात शेवटच्या षटकात पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु यानंतर २००९ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला होता. त्यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार युनूस खान होता. अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने श्रीलंका संघावर ८ गडी राखून पराभूत केले होते.
या स्पर्धेपूर्वी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या हंगामात युनूस खानने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या हंगामात त्याला एकच सामना खेळायची संधी मिळाली होती. त्यानंतर तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून आला नाही.
२) पॉल कॉलिंगवूड –
इंग्लंड संघाने २०१० मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया संघावर ७ गडी राखून विजय मिळवत टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी पॉल कॉलिंगवूडला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासाठी खेळण्याची संधी मिळाली होती. त्या हंगामात त्याने ८ सामने खेळले होते. परंतु त्याला एकही सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला आयपीएल स्पर्धा खेळायची देखील संधी मिळाली नव्हती.
३) लसिथ मलिंगा –
श्रीलंका संघाचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने या स्पर्धेत १७० गडी बाद केले आहेत. मलिंगाने २००९ पासून ते २०१९ पर्यंत मुंबई इंडियन्स संघासाठी मोलाची भूमिका पार पाडली. परंतु त्याला एकदाही या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. त्याला आयपीएल स्पर्धेत एकदाही संघाचे नेतृत्व करायची संधी मिळाली नसली तरीदेखील २०१४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने टी -२० विश्वचषकावर नाव कोरले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल तोंडावर असताना उसळला नवा वाद, ‘या’ कारणामुळे फ्रँचायझींचे बीसीसीआयला पत्र
नेमके बीसीसीआयने धोनीला टीम इंडियाचा मार्गदर्शक का बनवले? ‘माही’च्या सर्वात मोठ्या प्रशंसकाचाच सवाल






