आजपासून(17 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धतील सलामीचा सामना यजमान दक्षिण आफ्रिकेचा 19 वर्षांखालील संघ विरुद्ध 19 वर्षांखालील अफगाणिस्तान संघ यांच्यात होणार आहे.
बेनोनी, पोचेफस्टरूम, ब्लॉमफॉन्टेन आणि किम्बरली या चार शहरातील 8 ठिकाणी या विश्वचषकातील सामने होतील.
तसेच या विश्वचषकात 16 संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. या विश्वचषकात गतविजेत्या भारतीय संघाचा न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपानसह अ गटात समावेश करण्यात आला आहे.
भारताचा पहिला सामना 19 जानेवारीला श्रीलंकाविरुद्ध ब्लॉमफॉन्टेन येथील मँगाउंग ओव्हल येथे होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जपान विरुद्ध 21 जानेवारीला आणि न्यूझीलंड विरुद्ध 24 जानेवारी साखळी फेरीचे सामने खेळेल.
या स्पर्धेसाठी ब गटात गतउपविजेते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया आणि वेस्ट इंडीज यांचा समावेश आहे. क गटात पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि स्कॉटलँड यांचा समावेश असून ड गटात यजमान दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.
या विश्वचषकात साखळी फेरीनंतर सुपर लीग आणि प्लेट लीग या फेरी पार पडतील. साखळी फेरीनंतर चारही गटातील पहिल्या 2 क्रमांकावर असणारे संघ सुपर लीगमध्ये प्रवेश करतील. तर अन्य उर्वरित संघ प्लेट चॅम्पियनशीप खेळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 फेब्रुवारी रोजी पोचेफस्टरूम येथे पार पडेल .
या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहेत.
या विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा प्रियम गर्ग सांभाळणार आहे. तसेच या संघाचे उपकर्णधारपद ध्रुव चंद जुरेलकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्वचषकाचा गतविजेता आहे. भारताने 2018 ला झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा विश्वचषक जिंकला होता. भारताने आत्तापर्यंत 2000, 2008, 2012 आणि 2018 असे एकूण 4 वेळा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.
अशी आहे 19 वर्षांखालील विश्वचषक 2020 साठी सहभागी संघांची गटवारी –
अ गट – भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, जपान
ब गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नायजेरिया, वेस्ट इंडीज
क गट – पाकिस्तान, बांगलादेश, झिम्बाब्वे, स्कॉटलँड
ड गट – दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, अफगाणिस्तान
या विश्वचषकासाठी भारताचे साखळी फेरीचे वेळापत्रक –
भारत विरुद्ध श्रीलंका- 19 जानेवारी- मँगाउंग ओव्हल, ब्लॉमफॉन्टेन
भारत विरूद्ध जपान- 21 जानेवारी- मँगाउंग ओव्हल, ब्लॉमफॉन्टेन
भारत विरूद्ध न्यूझीलंड- 24 जानेवारी – मँगाउंग ओव्हल, ब्लॉमफॉन्टेन






