हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी महिला टी20 विश्वचषक 2024 ची अशी सुरुवात कोणालाच अपेक्षित नव्हती. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात संघाला 58 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडकडून हा पराभव मोठा मानला जात आहे. कारण महिला टी20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत या पराभवामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा नेट रनरेट -2.900 झाला आहे. जो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर 9 संघांमध्ये सर्वात वाईट आहे. हा नेट रन रेट भविष्यात भारतासाठी अडचणी निर्माण करू शकतो. या पराभवानंतर भारत अ गटातील गुणतालिकेत तळाच्या पाचव्या स्थानावर आहे.
भारताचा मार्ग आता सोपा नाही
टीम इंडियाचे पुढील तीन सामने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. भारताला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असेल तर हे तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅट्ट्रिक साधावी लागेल. इथून आणखी एक पराभव भारताला स्पर्धेतून बाहेर काढू शकतो. कारण यानंतर भारताचे भवितव्य आपल्या हातात राहणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा नेट रन रेट खूपच खालावला आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे रेकॉर्ड उत्कृष्ट असले तरी ऑस्ट्रेलियाकडून धोका
टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळलेल्या 15 पैकी 12 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाने 25 पैकी 19 वेळा श्रीलंकेचा पराभव केला आहे. मात्र विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत भारताला या दोन आशियाई संघांपासून सांभाळून राहावे लागणार आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने 7 पैकी 2 वेळा भारताचा तर एकदा श्रीलंकेचा पराभव केला आहे. हे दोन्ही संघ अपसेट खेचण्यात यशस्वी ठरले तर टीम इंडियासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.
ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर या फॉरमॅटमध्ये भारताचा कांगारूंविरुद्धचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आतापर्यंत 34 टी20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने फक्त 7 जिंकले आहेत. तर कांगारूंनी 25 वेळा भारताचा पराभव केला आहे. तर टी20 विश्वचषकामध्ये भारताला 6 पैकी 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
गटातील टॉप-2 संघांना पुढील फेरीसाठी म्हणजेच उपांत्य फेरीसाठी तिकिटे मिळतील. श्रीलंकेचा पराभव करत पाकिस्तानने स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. उरलेल्या तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानने दोन सामने जिंकले तर त्यांची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता वाढेल. दरम्यान संघाला विजय मिळाला तर प्रकरण निव्वळ रनरेटवर अडकू शकते.
भारताची परिस्थितीही अशीच आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. जर संघ एकही सामना गमावला तर प्रकरण नेट रन रेटवर अडकेल आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचा नेट रन रेट खूपच खराब आहे.
न्यूझीलंडचे पुढील तीन सामने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. या तीनपैकी आणखी दोन सामने जिंकून किवी संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला आघाडीवर ठेवू शकतो.
हेही वाचा-
indw vs nzw; टीम इंडियच्या पराभवाची ही तीन मोठी कारणे..
INDW vs NZW; सलामी सामन्यातच टीम इंडिया बॅकफूटवर, न्यूझीलंडचा सोपा विजय
भारतीय संघ क्षेत्ररक्षणात मजबूत होणार! भारताच्या फिल्डिंग कोचने आखली नवी योजना