आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 च्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानशी झाला. ज्यामध्ये कांगारू संघाने 9 विकेट्सने एकतर्फी विजय नोंदवला. स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग तिसरा विजय ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांच्यासाठी योग्य ठरला. पहिल्या डावात खेळताना पाकिस्तानचा संघ 19.5 षटकांत 82 धावांत गारद झाला. प्रत्युत्तराच्या डावात ऑस्ट्रेलियाने 11 षटकांत 1 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.
पाकिस्तान संघाच्या फलंदाजांची खराब कामगिरी होती. संघाचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा पार करण्यात यशस्वी ठरले. संघाकडून आलिया रियाझने (29) सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनरने 4 षटकात केवळ 21 धावा देत 4 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला फारशी अडचण आली नाही. बेथ मुनी आणि एलिसा हिली या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. मुनी 15 धावा करून बाद झाला. तर हीली 37 धावा करून रिटायर्ड हर्ट झाली परिणामी तिला मैदानातून परतावे लागले. एलिस पेरी (22*) आणि गार्डनर (7*) यांनी संघाला विजय मिळवून दिला. या विजयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.
ऑस्ट्रेलियाने आता तीन विजयांसह ‘अ’ गटात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर असून उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत. पाकिस्तान आता ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानी संघाला किवीजला पराभूत करणे फार कठीण जाईल.
याचा अर्थ स्पष्ट आहे की आता भारत आणि न्यूझीलंडमधील एकच संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. भारताला 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. जो त्यांना कोणत्याही किंमतीवर जिंकायचा आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला प्रार्थना करावी लागेल की, श्रीलंका आणि पाकिस्तान यापैकी एक संघ न्यूझीलंडचा पराभव करेल. न्यूझीलंडने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले आणि ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले तर न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, जर न्यूझीलंडने एक सामना जिंकला आणि एक हरला, तर या दोघांपैकी ज्या संघाचा नेट रनरेट चांगला असेल तो उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
हेही वाचा-
बीसीसीआयमुळे आरसीबीला करोडोंचा फायदा! मेगा लिलावापूर्वी बंगळुरुसाठी आनंदाची बातमी
IND vs BAN: हर्षित राणाचे पदार्पण? सॅमसन-हार्दिक आणि मयंक यादव बाहेर? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मोहम्मद शमी टीम इंडियात कधी परतणार? न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही स्थान नाही