रविवारी (8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला आणि पाचव्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.
या सामन्यानंतर आयसीसीने महिला टी20 विश्वचषकातली सर्वोत्कृष्ट संघाची निवड केली आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघातील केवळ 2 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये फिरकीपटू पूनम यादवचा आणि 16 वर्षीय फलंदाज शेफाली वर्माचा समावेश आहे. पूनमला अंतिम 11 जणांच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या संघात संधी देण्यात आली आहे. तर शेफालीचा 12 वी खेळाडू म्हणून या संघात समावेश आहे.
या विश्वचषकात पूनम सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने 5 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर शेफालीनेही या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. तिने 158.25 च्या स्ट्राईक रेटने 163 धावा केल्या आहेत.
या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या 5 खेळाडूंचा आणि इंग्लंडच्या 4 खेळाडूंचा या संघात समावेश आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डला या संघात निवडण्यात आले आहे. तसेच या संघाची कर्णधार मेग लॅनिंगला करण्यात आले आहे.
आयसीसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवड समितीने या टी20 विश्वचषकाती सर्वोत्कृष्ट संघाची निवड करण्यासाठी समालोचक आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू इयान बिशप, अंजुम चोप्रा आणि लिसा स्थळेकर, पत्रकार रॅफ निकल्सन आणि आयसीसीचे प्रतिनिधी होली कोल्विन यांचा समितीत समावेश होता.
असा आहे आयसीसीचा महिला टी20 विश्वचषकाचा सर्वोत्कृष्ट संघ-
एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया ), बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया ), नॅटली सायव्हर (इंग्लंड), हीथ नाइट (इंग्लंड), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया-कर्णधार), लॉरा वोल्वार्ड (द. आफ्रिका), जेस जोनासेन (ऑस्ट्रेलिया ), सोफी इक्लेस्टोन (इंग्लंड), अन्या श्रीबसोले (इंग्लंड), मेगन शुट्ट (ऑस्ट्रेलिया ), पूनम यादव (भारत), 12 वी खेळाडू: शेफाली वर्मा (भारत)