आयसीसीची 12 वी विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्स येथे सुरु होणार आहे. त्यामुळे आता पुढील एक ते दिड महिन्यात या विश्वचषकासाठी संघ जाहीर होतील. याचमुळे आता या विश्वचषकाच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. अनेक क्रिकेटतज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे संभाव्य संघही जाहीर केले आहेत.
यामध्ये आता भारताचा विश्वचषक विजेता माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचाही समावेश झाला आहे. त्यानेही विश्वचषकासाठी भारताचा संघ कसा असावा याबद्दल मते मांडली आहेत.
गंभीरने त्याच्या संभाव्य भारतीय संघात सलामीला फलंदाजीसाठी रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुलची निवड केली आहे.
तसेच गंभीरने मधल्या फळीत विराट कोहली, अंबाती रायडू आणि एमएस धोनीला संधी दिली आहे. त्याचबरोबर त्याने धोनीसह दुसरा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक किंवा रिषभ पंतचा दुसरा यष्टीरक्षक म्हणून विचार केलेला नाही. त्याने दुसरा यष्टीरक्षक म्हणून राहुलचा पर्याय ठेवला आहे.
याबरोबरच गंभीरने अष्टपैलू म्हणून केदार जाधव, विजय शंकर आणि हार्दिक पंड्या यांना या संघात स्थान दिले आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरने आर अश्विनलाही 16 जणांच्या संभाव्य भारतीय संघात संधी दिली आहे. अश्विन मागील अनेक महिन्यांपासून मर्यादीत षटकांच्या भारतीय संघातून बाहेर आहे.
अश्विनसह गंभीरच्या या संभाव्य भारतीय संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंचाही समावेश आहे. तसेच त्याने मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड केली आहे.
असा आहे गौतम गंभीरचा विश्वचषकासाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, अंबाती रायडू, केदार जाधव, हार्दिक पंड्या, एमएस धोनी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, विजय शंकर, आर अश्विन.
महत्त्वाच्या बातम्या-
–अशी आहे विश्वचषक २०१९साठी व्हीव्हीएसची १५ सदस्यीय टीम इंडिया
–हा खेळाडू विश्वचषक २०१९मध्ये टीम इंडियासाठी ठरणार जायंट किलर
–काल क्रिकेटविश्वातील या ५ ट्वीटची झाली सर्वाधिक चर्चा