भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका आपल्या नावे केली. याच बरोबर, भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला न्यूझीलंडसोबत होईल. हा अंतिम सामना याचवर्षी इंग्लंडमध्ये १८ ते २२ जून दरम्यान होणार आहे.
हा सामना इंग्लंडमधील साउथँम्पटन येथील रोज बाऊल स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी हा सामना लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानात खेळवण्यात येणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलून साउथँम्पटन करण्यात आले आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबतची माहिती दिली आहे.
तसेच आयसीसी या सामन्यासाठी मर्यादीत प्रेक्षकांनाही हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश देणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्याचे ठिकाण बदलाबाबतचा निर्णय इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा करुन आणि कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन घेतला आहे.
गांगुलीनेही केली होती पुष्टी
काहीदिवसांपूर्वीच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते, “जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना साऊथँम्पटन येथे खेळला जाणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच निर्णय झाला होता. कोविड-१९ मुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मैदानापासून हॉटेल जवळ असल्याने बायो-बबलचे नियमन करणे सोपे जाईल.”
भारताने इंग्लंडला पराभूत करत गुणतालिकेत मिळवले अव्वल स्थान
भारताने नुकतेच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ७२.२ टक्केवारीसह अव्वल क्रमांक मिळवत अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले आहे.
तर ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी आपला दक्षिण आफ्रिकेचा नियोजित दौरा रद्द केला. त्यामुळे न्यूझीलंडने ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह याआधीच अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे आता साउथँम्पटनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी अंजिक्यपद पटकावण्यासाठी अंतिम सामना रंगेल.
महत्त्वाच्या बातम्या –
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप: ‘लॉर्ड्स’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना