बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी त्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, आयसीसीने बांगलादेश संघाला टी20 वर्ल्ड कप 2026 चे सामने भारतात खेळण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. बीसीबी अध्यक्षांनी अल्टीमेटमच्या या सर्व बातम्या पूर्णपणे फेटाळल्या आहेत.
बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना अमिनुल इस्लाम बुलबुल म्हणाले की, त्यांनी सुरक्षेच्या संदर्भात यापूर्वीच आयसीसीला पत्र लिहिले होते. त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परदेशी दौऱ्यावर जाण्यापूर्वी सरकारची परवानगी आवश्यक असते. अमिनुल म्हणाले की, या वर्ल्ड कपच्या संदर्भात ते आपल्या हक्कांसाठी लढत राहतील. तसेच, बांगलादेशने यापूर्वीही अनेक वर्ल्ड कप खेळले आहेत, परंतु आजवर त्यांच्याकडून अशी कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती, असेही अध्यक्षांनी नमूद केले.
बीसीबी अध्यक्ष पुढे म्हणाले, “आयसीसीने आम्हाला असे सांगणे की बांगलादेशचे सामने श्रीलंकेत आयोजित करणे अशक्य आहे, हा सगळा केवळ एक प्रोपोगंडा आहे. हे पूर्णपणे खोटे वृत्त आहे. आम्ही सतत आयसीसीच्या संपर्कात आहोत आणि त्यांनी आम्हाला आमच्या समस्या मांडायला सांगितल्या आहेत. सध्या आम्ही त्याच समस्या त्यांच्यासमोर मांडत आहोत.”
टी20 वर्ल्ड कपसाठी भारत दौऱ्यावर न गेल्यामुळे बांगलादेशचे काय नुकसान होऊ शकते? असे विचारले असता बीसीबी अध्यक्ष म्हणाले की, बोर्डाने अशा परिस्थितीचाही विचार केला आहे. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळी भारतीय संघ पाकिस्तानला गेला नव्हता, त्याचप्रमाणे पाकिस्तानी संघ गेल्या काही वर्ल्ड कपसाठी भारतात गेला नाहीये.
भारतातील सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव वेळ पडल्यास वर्ल्ड कपचा त्याग करू, पण आपल्या निर्णयापासून मागे हटणार नाही, असे बीसीबी अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले आहे.






