ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा स्टार्क पहिल्या दोन सामन्यांत पूर्णपणे निष्प्रभ दिसला. चेंडूनं तो महागडा ठरत आहे. त्यानं सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पहिल्या सामन्यात 53 धावा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दुसऱ्या सामन्यात 47 धावा दिल्या. त्यानं आतापर्यंत 8 षटकात 100 धावा दिल्या असून विकेट मात्र एकही घेतलेली नाही. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 12.50 एवढा राहिला.
स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. केकेआरने आपल्या वेगवान आक्रमणाला बळ देण्यासाठी त्याला 24 कोटी 75 लाख रुपयांना लिलावात खरेदी केलं होतं. स्टार्कनं आयपीएलमध्ये अद्याप आपली छाप सोडली नसल्यानं त्याची फ्रँचायझी चिंतेत असेलच, परंतु क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे.
आता आइसलँड क्रिकेटनं कांगारूंच्या या वेगवान गोलंदाजाची खिल्ली उडवली आहे. आईसलँड क्रिकेटनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिलं, “आईसलँडमधील एका बिअरपेक्षाही जास्त महाग.” आइसलँड क्रिकेटच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. “स्टार्कला घेणं म्हणजे पैशाचा अपव्यय असल्यासारखं वाटतं,” अशी टिप्पणी एका युजरनं केली.
More expensive than a beer in Iceland https://t.co/97ycaD58wu
— Iceland Cricket (@icelandcricket) March 29, 2024
दुसरीकडे, केकेआरचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना विश्वास आहे की स्टार्क लवकरच सर्वोत्तम कामगिरी करेल. अरुण म्हणाले की,”स्टार्ककडे खूप अनुभव आहे. तो आपला दर्जा आणि क्षमता नक्कीच दाखवेल, फक्त थोड्या संयमाची आवश्यकता आहे.” मिशेल स्टार्क 9 वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळत आहे. तो यापूर्वी 2015 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये खेळला होता.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, शुक्रवारी (29 मार्च) झालेल्या सामन्यात केकेआरनं आरसीबीवर 7 गडी राखून विजय मिळवला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीनं दिलेलं 183 धावांचं लक्ष्य कोलकातानं अवघ्या 16.5 षटकांत गाठलं. कोलकाताकडून सामनावीर सुनील नरेननं 22 चेंडूत धमाकेधार 47 धावा ठोकल्या. याशिवाय गोलंदाजी करतानाही त्यानं एक बळी घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
“कोणतंही भांडण असेल तर…”, कोहली-गंभीर वादावर दिल्ली पोलिसांची पोस्ट व्हायरल