मेलबर्न। काल (8 मार्च) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा 85 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद मिळवले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या एलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी केलेल्या तुफानी अर्धशतकी खेळी महत्त्वाच्या ठरल्या. त्यांच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले होते.
हिलीने 39 चेंडूत 75 धावा केल्या. या खेळीत तिने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. तर मूनीने 54 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 78 धावांची खेळी केली. या दोघींच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 5 बाद 184 धावांचा डोंगर उभा करता आला होता.
विशेष म्हणजे या दोघींनाही एकेरी धावसंख्येवर असताना भारताकडून जीवदान मिळाले होते. हेलीचा पहिल्याच षटकात कव्हर्सला क्षेत्ररक्षण करत असलेल्या शेफाली वर्माकडून झेल सुटला होता. त्यावेळी हेली 9 धावांवर होती. तर त्यानंतर चौथ्या षटकात मूनीचा 8 धावांवर असताना गोलंदाजी करणाऱ्या राजेश्वरी गायकवाडलाच झेल घेण्याची संधी होती. पण तिने ती दवडली.
सुरुवातीलाच महत्त्वाचे झेल घेण्याच्या संधी भारताने सोडल्याने त्याचा जोरदार फटका भारताला बसला. कारण त्यानंतर हिली आणि मूनीने जीवदानाचा पुरेपुर फायदा घेत भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले आणि ऑस्ट्रेलियाला या सामन्यात भक्कम सुरुवात करुन दिली. या दोघींनीही 115 धावांची सलामी भागीदारी रचली.
त्यानंतर 185 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला 19.1 षटकात सर्वबाद 99 धावाच करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
–टेनिसलाही बसला कोरोना व्हायरसचा फटका, ही मोठी स्पर्धा रद्द
–केवढी मोठी किमया! महिला क्रिकेटच्या फायनलसाठी पहिल्यांदाच उपस्थित होते एवढे चाहते!