ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. या मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरॉन ग्रीनला आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करण्याची संधी आहे. असे असले तरीही, त्याला मागील आठवड्यात झालेल्या दुखापतीमधून बरे व्हावे लागेल. संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी याबाबत पुष्टी केली आहे की, जर ग्रीनने सर्व फीटनेस टेस्ट पास केल्या, तर त्याला बॅगी ग्रीन (पदार्पण करताना दिली जाणारी टोपी) टोपी मिळेल. खरं तर मागील आठवड्यात ग्रीनला कन्कशनचा सामना करावा लागला होता.
…तर तो नक्कीच खेळेल- लँगर
प्रशिक्षक लँगर यांनी म्हटले की, “जर ग्रीनने सर्व फीटनेस टेस्ट पास केल्या, तर तो नक्कीच खेळेल. आम्ही कन्कशन प्रोटोकॉलमधून जात आहोत. ही त्याच्याबरोबर घडणारी एक अतिशय अनोखी घटना होती. काल रात्री मी त्याला पाहिले, त्याच्या चेहऱ्यावर खूप हसू आहे, आज सकाळी त्याची आणखी एक परीक्षा झाली की आम्हाला त्याच्याबद्दल चांगली बातमी मिळाली. त्याने निवडीसाठी हक्क मिळविला आहे. जर तो तंदुरुस्त असेल आणि उपलब्ध असेल, तर तो आपले कसोटी पदार्पण करेल.”
दुसऱ्या सरावादरम्यान झाली होती दुखापत
भारत आणि ऑस्ट्रेलिया ए संघात खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सराव सामन्यादरम्यान ग्रीनच्या डोक्याला जसप्रीत बुमराहचा चेंडू लागला होता. या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बुमराह फलंदाजी, तर ग्रीन गोलंदाजी करत होता. बुमराहने एक सरळ शॉट खेळला होता आणि तो चेंडू थेट जाऊन ग्रीनच्या डोक्याला लागला होता. त्यानंतर तो जमिनीवर बसला होता. यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. ग्रीन ऍडलेड ओव्हलमध्ये ऑस्ट्रेलिया संघासोबत आज (१५ डिसेंबर) आणि उद्या सराव करेल. जर त्याला सर्व आवश्यक फीटनेस टेस्ट पास करता आल्या, तर गुरुवारी (१७ डिसेंबर) खेळल्या जाणाऱ्या दिवस- रात्र कसोटी सामन्यात त्याला संधी मिळेल. मागील आठवड्यात भारत अ विरुद्धच्या सराव सामन्यात त्याने नाबाद अर्धशतक ठोकले होते.
कसोटीत पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियाचा सर्वात युवा खेळाडू
जर गुरुवारी ग्रीनने पदार्पण केले, तर त्याचे वय २१ वर्षे १९७ दिवस असेल. अशामध्ये तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियाचा सर्वात युवा खेळाडू असेल. त्याच्यापूर्वी मॅथ्यू रेनशॉच्या नावावर हा विक्रम होता. त्याने २० वर्षे आणि २४१ दिवसांच्या वयात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१६ मध्ये याच मैदानावर पदार्पण केले होते.
असे असतील दोन्ही संघ
ऑस्ट्रेलिया कसोटी संघ-
टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जॉश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर
भारतीय कसोटी संघ-
विराट कोहली (कर्णधार, केवळ पहिल्या कसोटीसाठी), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
IndvsAus: वाक् युद्धाला झाली सुरुवात; ‘या’ भारतीय खेळाडूने दिला ऑस्ट्रेलियन संघाला इशारा
T20 World Cup 2022: १५ जागांसाठी भिडणार ८६ संघ; ‘हे’ तीन संघ उतरणार पहिल्यांदाच मैदानात
अफलातून! सिडनीच्या ‘या’ फलंदाजाने ठोकल्या २५ चेंडूत ६५ धावा; ७ षटकारांचाही समावेश