पुणे । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करायची संधी आहे. क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात एकाचवेळी अव्वल स्थानावर विराजमान होण्याची मोठी संधी विराट मिळणार आहे.
विराट सध्या वनडे क्रमवारीत ८८९ गुणांसह अव्वल तर टी२०मध्येही ८२४ गुणांसह तो पहिल्या स्थानावर आहे. कसोटीत विराटच्या नावावर ८९३ गुण असून तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ (९३८) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
विराट आणि स्मिथमध्ये ४५ गुणांचा फरक आहे. जर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट चमकदार कामगिरी करू शकला तर तो तिन्ही प्रकारात एकाचवेळी अव्वल स्थानावर येऊ शकतो.
२००५-२००६ या काळात रिकी पॉन्टिंग क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी होता. त्याने डिसेंबर २००५ ते जानेवारी २००६मध्ये हा पराक्रम केला होता. तेव्हा तो केवळ दोन टी२० सामने खेळला होता आणि त्यात त्याने ९८ धावा केल्या होत्या. त्यावर्षी नुकतेच टी२० क्रिकेट सुरु झाले होते आणि पॉन्टिंगने पहिल्याच सामन्यात नाबाद ९८ धावांची खेळी केली होती. अन्य प्रकारात तर अव्वल होताच.
त्याचमुळे तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकाचवेळी अव्वल स्थानी आला होता. त्याचाच देशबांधव आणि समकालीन खेळाडू मॅथ्यू हेडनसुद्धा तिन्ही प्रकारात अव्वल स्थानी आला आहे परंतु तो वेगवेगळ्या महिन्यात ही कामगिरी साधू शकला आहे.
विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता तो हा विक्रम नक्की करेल.