भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा आणि शेवटचा टी20 सामना आहे. हा सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
हा सामना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना असण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघ यानंतर जवळजवळ जूलैपर्यंत एकही टी20 सामना खेळणार नाही.
तसेच यानंतर भारतीय संघ 2 मार्चपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धा पार पडेल. आयपीएल नंतर लगेचच 30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. ही स्पर्धा 14 जूलैपर्यंत असणार आहे.
त्याचबरोबर या विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती घेणार असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही याआधीच सुचित केले आहे. त्यामुळे जर खरचं धोनीने विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, तर आजचा टी20 सामना हा धोनीचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरणार आहे.
धोनीने आत्तापर्यंत 97 टी20 सामने खेळले असून यात त्याने 37.54 च्या सरासरीने 1577 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी-कोहलीमधील ती खास शर्यत नक्की जिंकणार कोण?
–भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२०आधी ऑस्ट्रेलिया संघाला बसला मोठा धक्का
–आज होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात या खास विक्रमांवर असेल नजर






