दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गाबा येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर अश्विननं निवृत्तीचा बॉम्ब टाकला. आता अश्विनच्या निवृत्तीनंतर सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तानातून मोठा दावा करण्यात आला आहे. विराट कोहली जर टीम इंडियाचा कर्णधार असता, तर त्यानं अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती, असं म्हटलं जात आहे.
पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली म्हणाले की, विराट कोहली जर टीम इंडियाचा कर्णधार असता तर त्यानं अश्विनला मालिकेच्या मध्यभागी निवृत्ती घेण्यापासून रोखलं असतं कारण टीम इंडियाला सिडनी कसोटीत त्याची गरज होती. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाले, “मी खात्रीने सांगू शकतो, जर विराट कोहली कर्णधार असता, तर त्यानं अश्विनला अशाप्रकारे निवृत्त होऊ दिलं नसतं. त्यानं अश्विनला आणखी दोन कसोटींसाठी थांबवलं असतं, कारण सिडनी कसोटीत भारताला अश्विनची आवश्यकता आहे. जर रवी शास्त्री किंवा राहुल द्रविड देखील टीम इंडियाचे प्रशिक्षक असते, तरी त्यांनी अश्विनला निवृत्त होऊ दिलं नसतं.”
बासित अली पुढे म्हणाले, “हे चुकीचं आहे की रोहित आणि गंभीरनं त्याचं मन वळवलं नाही. या सामन्यांमध्ये नाही, मात्र विशेषत: सिडनीमध्ये तुझी गरज आहे, असं त्यांनी सांगितलं नाही.”
अश्विनच्या अचानक निवृत्तीमागे काहीतरी रहस्य होतं, जे त्याच्या देहबोलीतून दिसून येत असल्याचं बसित अली यांनी सांगितलं. ते म्हणाले, “अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही सांगू शकत नाही, पण तरीही समजू शकता. त्यानं विराट कोहलीला ज्या पद्धतीनं मिठी मारली, बॉडी लँग्वेज सर्वकाही सांगते”.
रविचंद्रन अश्विन हा भारताकडून दुसरा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे. त्यानं आपल्या कारकिर्दीत 537 कसोटी विकेट घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्यांच्या यादीत माजी फिरकीपटू अनिल कुंबळे 619 विकेटसह पहिल्या स्थानावर आहेत.
हेही वाचा –
हेड कोच गंभीरमुळे अश्विनने अचानक निवृत्ती घेतली? या 6 मुद्द्यांनी समजून घ्या पडद्यामागची संपूर्ण कहानी
“अश्विनच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं, त्याला योग्य निरोप मिळायला हवा”, महान कर्णधाराचं वक्तव्य
“माझ्या मुलाला जबरदस्तीनं निवृत्त करण्यात आलं”, आर अश्विनच्या वडिलांचा धक्कादायक आरोप!