इंग्लंडच्या भारत दौऱ्याला येत्या ५ फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याने सुरुवात होते आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही संघांनी काय रणनिती आखावी, याबाबत मते व्यक्त केली जात आहे. यात आता इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांचीही भर पडली आहे. थॉर्प यांनी नुकतेच आगामी मालिकेत भारताविरुद्ध गोलंदाजांची भूमिका निर्णायक असेल, असे मत व्यक्त केले.
“यजमानांच्या फलंदाजी फळीवर टाकावा लागेल दबाव”
थॉर्प यांना यावेळी जेम्स अँडरसनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या गोलंदाजी माऱ्याने विराट कोहलीसाठी काही खास रणनिती आखली आहे का, असे विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, “आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तो एक अतिशय दर्जेदार खेळाडू आहे. गेले काही वर्षे त्याने ते सातत्याने सिद्ध देखील केले आहे. तसेच भारतीय फलंदाजांना मायदेशातील परिस्थितीचा पूर्ण अंदाज असून विराटलाही त्याची अचूक जाण आहे.”
पुढे ते म्हणाले, “त्यामुळे आमच्या गोलंदाजांसाठी आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणे आवश्यक असेल. फिरकीपटू असो किंवा वेगवान गोलंदाज, तुम्ही यापेक्षा अधिक अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू शकत नाही. आम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल आणि त्यांनतर त्या जोरावर भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू.”
“भारतीय गोलंदाजी केवळ फिरकीवर विसंबून नाही”
गेल्या काही वर्षांत भारतीय वेगवान गोलंदाजांची फळी विकसित झाल्याने भारताचे गोलंदाजी आक्रमण आता केवळ धीम्या गतीच्या खेळपट्टीवरील फिरकीच्या जादूवर विसंबून नाही. ग्रॅहम थॉर्प यांना याची जाणीव आहे. “भारताची गोलंदाजी आता केवळ फिरकीपटूंवर अवलंबून नाही. त्यांचे वेगवान गोलंदाज देखील जागतिक दर्जाचे आहेत. त्यामुळे आता केवळ फिरकीपटूंवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही”, असे ते म्हणाले.
इंग्लंडचे अनेक खेळाडू भारतात पहिल्यांदाच कसोटी खेळत आहेत, याबाबत चिंता नसल्याचेही थॉर्प यांनी स्पष्ट केले. युवा खेळाडू अननुभवी असले तरी ते कठोर मेहनत घेत आहेत, आणि त्याच बळावर ते यश मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
सिडनी सिक्सर्सचा बिग बॅशच्या अंतिम फेरीत प्रवेश, जेम्स व्हिन्सची खेळी ठरली निर्णायक
आयएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्ट युनायटेडचा मुंबई सिटीला पुन्हा धक्का
कोणत्याही परिस्थितीत टोक्यो ऑलिम्पिक होणारच!, जपानचे पंतप्रधान सुगा यांची ग्वाही






