पुणे – पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत किड्स गटात अंतिम फेरीत ऍव्हेंजर्स संघाने गार्डीयन्स संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या अंतिम लढतीत दोन्ही संघानी सुरुवातीपासूनच तोडीस तोड खेळ केला. 7व्या मिनिटाला विहान राठोडने गोल करून ऍव्हेंजर्स संघाचे खाते उघडले. त्यानंतर गार्डीयन्सच्या खेळाडूंनी प्रातिक्रमण करत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न केले. पण ऍव्हेंजर्स संघाने आपली बचावफळी अभेद्य ठेवत गोल होउ न देण्याची खबरदारी घेतली. पूर्वार्धात हि आघाडी आघाडी कायम होती.
उत्तरार्धात, अठराव्या मिनिटाला अनय इंगळहळीकरने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण अखेरपर्यंत हि बरोबरी कायम राहिली. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकरमध्ये खेळविण्यात आला. टायब्रेकरमध्ये ऍव्हेंजर्सकडून संवित कासट, ओजस नाईक, विहान कोठारी, आरुष दिवेकर यांनी गोल केला. गार्डीयन्सकडून आर्यन गाडगीळ, अथर्व इंगळहळीकर, रोहिन लागु यांनी गोल केले. तर गार्डीयन्सच्या रेवांश कासटने चेंडू बाहेर मारला.
स्पर्धेतील विजेत्या ऍव्हेंजर्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर आणि रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, अभिषेक भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी: किड्स गट:
ऍव्हेंजर्स:1 (विहान राठोड 7मि.) वि.गार्डीयन्स:1(अनय इंगळहळीकर 18मि.);
ऍव्हेंजर्स: 4(संवित कासट, ओजस नाईक, विहान कोठारी, आरुष दिवेकर)वि.वि.गार्डीयन्स:3(आर्यन गाडगीळ, अथर्व इंगळहळीकर, रोहिन लागु(गोल चुकविला – रेवांश कासट); पूर्ण वेळ: 1-1.
इतर पारितोषिके
बेस्ट डिफेंडर: आनंदी बेडेकर व अथर्व इंगळहळीकर
मोस्ट असिस्ट: ओजस नाईक
गोल्डन ग्लोव्ह: आरुष दिवेकर
गोल्डन बूट: विहान राठोड
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: संवित कासट.