आयपीएल २०२२ ची सुरुवात रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्ससाठी खूपच निराशाजनक राहिली. शनिवारी (२ मार्च) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात राजस्थानने मुंबईला २३ धावांनी मात दिली. मुंबईसाठी हा त्यांचा चालू हंगामातील सगल दुसरा पराभव ठरला. या पराभवाचे कारण म्हणजे संघातील खेळाडूंचे सुमार प्रदर्शन. अशात पुढच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात काही बदल दिसू शकतात.
मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराब प्रदर्शन करणे काही नवीन बाब नाहीय. परंतु चेन्नई सुपर किंग्जसाठी मात्र ही गोष्ट गंभीर आहे. सीएसकेनेही आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील त्यांचे पहिले दोन सामने गमावले आहेत. ही पहिलीज वेळ आहे, जेव्ही सीएसकेने आयपीएलमध्ये त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. तसेच हा पहिला आयपीएल हंगाम आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांनी स्वतःचे पहिले दोन सामने गमावले आहेत.
या निराशाजनक प्रदर्शनानंतर मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन संघात काही महत्वाचे बदल करू सकते. मुंबईच्या संघातील काही खेळाडूंनी हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खूपच खराब प्रदर्शन केले. यामध्ये बसील थंपी, अनमोलप्रीत सिंग, मुरगन अश्विन, डॅनियल सॅम्स, टीम डेविड यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल आणि पुढच्या सामन्यात यापैकी काही खेळाडूंना बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते.
वेगवान गोलंदाज बसील थंपी (Basil Thampi) याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३५ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या होत्या, पण दुसऱ्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने २६ धावा खर्च केल्या. मुंबईसाठी खेळताना अनमोलप्रीत सिंगने (Anmolpreet Singh) पहिल्या सामन्यात ८ तर दुसऱ्या सामन्यात ५ धावा केल्या. त्यानंतर फिरकी गोलंदाज मुरगन अश्विनचा (Murugan Ashwin) विचार केला, तर त्याने पहिल्या सामन्यात २ आणि दुसऱ्या सामन्यात शून्य विकेट्स घेतल्या, यादरम्यान त्याने अनुक्रमे १४ आणि ३२ धावा खर्च केल्या.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू डॅनियल सॅम्स (Daniel Sams) देखील प्रभाव पाडू शकला नाही, त्याने पहिल्या सामन्यात तब्बल ५७ धावा खर्च केल्या आणि फलंदाजीत नाबाद ७ धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीत ३२ धावा खर्च केल्या आणि फलंदाजीत एकही धाव करू शकला नाही. या दोन्ही सामन्यांमध्ये सॅम्सचा हाती एकही विकेट आली नाही. सिंगापूरचा फलंदाज टिम डेविड (Tim David) पहिल्या सामन्यात १२ आणि दुसऱ्या सामन्यात १ धाव करून बाद झाला. अशात या पाच खेळाडूंपैकी काहींना पुढच्या सामन्यात खेळण्याची संधी न मिळण्याची पूर्ण शक्यता आहे
दरम्यान, मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या चालू हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून ४ विकेट्सने पराभव मिळाला होता, तर आता दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २३ धावा शिल्लक ठेऊन मात दिली.
महत्वाच्या बातम्या –
बटलरच्या वादळापुढे उडाली मुंबई, इशान-तिलकच्या झुंजार खेळी व्यर्थ; राजस्थानचा २३ धावांनी विजय
तोडफोड मंडळाचे नवे अध्यक्ष.! नव्या दमाच्या मुंबईकराचे वादळी अर्धशतक, मोडला इशानचा ‘मोठा’ विक्रम
सेफ हँड्स! पडीक्कलचा झेल रोहितसाठी ठरला विक्रमी, पूर्ण केले ट्वेंटी ट्वेंटीमधील ‘दीडशतक’






